कॉलेजरोडला बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

978
leopard-cidco-aurangabad

नाशिक शहरातील कॉलेजरोड भागात आज शुक्रवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात 45 वर्षीय महिला जखमी झाली आहे. शहराच्या मध्यवस्तीत ही घटना घडल्याने रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे.

कॉलेजरोडवरील श्रद्धा पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावरील शिवम् कलेक्शन परिसरात सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पायी जाणार्‍या 45 वर्षीय महिलेवर हल्ला केला, त्यानंतर त्याने धूम ठोकली. या जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ही मजूरकाम करणारी महिला आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली. एका व्यक्तीने बिबट्याला इमारतीजवळून उडी मारताना बघितल्याचे त्यांनी सांगितले.

या हल्ल्याबाबत कळताच पोलीस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे, दुकानांच्या सीसीटीव्हीचे फुटेजही बघितले आहे. आता या भागात दिवस-रात्र गस्त घालण्यात येईल, तरीही नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन भदाणे यांनी केले आहे.

दीड वर्षातील तिसरी घटना

हा बिबट्या भरवस्तीत कसा आला, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मागील वर्षी २५ जानेवारी रोजी सावरकरनगर भागात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन माध्यम प्रतिनिधी, नगरसेवक आणि वनरक्षक असे चौघे जखमी झाले होते. त्यानंतर फेब्रुवारीतही सावरकरनगरला अशीच घटना घडली, तेव्हा बिबट्याच्या हल्ल्यात वनअधिकारी जखमी झाले होते. दीड वर्षात तिसर्‍यांदा बिबट्या नागरी वस्तीत आल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या