भय इथले संपत नाही, कोल्हारमध्ये एक बिबट्या जेरबंद; दोन बिबट्यांचा अद्यापही मुक्त संचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हार येथील रानशेंडा परिसरात गत एक वर्षापासून धुमाकूळ घालणाऱ्या तीन बिबट्यांपैकी दीड वर्षीय एक बिबट्या काल पहाटे सापळ्यात जेरबंद झाला. मात्र आद्यपही दोन बिबट्यांचा वावर असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

राहाता तालुक्यातील कोल्हार जवळ रानशेंडा येथे उल्हास लक्ष्मण खर्डे यांच्या शेतामध्ये मागील एक महिन्या पासून वनविभागाने पिंजरा लावला होता. मात्र चतुर बिबट्या पिंजऱ्यातील आमिषाला बळी न पडता वारंवार हुलकावणी देत होता. या परिसरातील कुत्री, कोंबड्या, बकरे आदी पक्षी व जनावरे बिबट्याने फस्त केली आहेत. वारंवार सापळा हलवूनही बिबट्या जेरबंद होत नव्हता. त्यामुळे येथील वस्तीवरील नागरिकांना रात्री सात नंतर घराबाहेर पडणे मुश्किल बनले होते. रानशेंडा येथील नागरिक सध्या बिबट्याच्या दहशती खाली वावरत आहेत. पहाटे तीन बिबट्यांपैकी दिड वर्षीय बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला.

सोमवारी सकाळी बिबट्याच्या गगनभेदी डरकाळ्याने वस्तीवरील नागरिक पिंजऱ्याकडे धावले असता एक बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला दिसला. याबाबत कोपरगांव वनक्षेत्रपाल एस.एम. जाधव, बी.एस. गाढे व जी. बी. सुरासे यांना संपर्क केला असता त्यांनी तातडीने धाव घेत भूलीचे औषध देऊन बिबट्यास ताब्यात घेतले. जेरबंद बिबट्यास आता निसर्गात मुक्त करण्यात येईल. मात्र या बिबट्या सोबत आणखी एक बिबट्या व बछडे याच परिसरात वास्तव्य करीत असल्याने बिबट्याचे भय इथे संपत नाही.