
रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे भोसलेवाडी येथे एका घराच्या पडवीमध्ये साधारण चार-पाच महिन्यांचे बिबटय़ाचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. शनिवारी सकाळी ही बाब उघड झाली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ते खाद्य मिळवण्यासाठी बाहेर पडले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ज्या पडवीमध्ये हे पिल्लू आढळले, तेथे आसपास त्या कुटुंबातील काही जण झोपतात. या पिल्लाची आई जवळपास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची खबर गावडे आंबेरे पोलीस पाटील यांनी पूर्णगड सागरी पोलीस ठाणे तसेच वन विभागालाही दिली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पोलीस व पंचांच्या समोर पंचनामा करून बिबटय़ाच्या पिल्लास पोस्टमार्टमकरिता रत्नागिरी येथे घेऊन गेले.