
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील गोरे वस्तीनजीक असलेल्या कॅनॉलमध्ये पाण्यात पडलेल्या बिबटय़ाला आज सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. वन विभाग, रेस्क्यू टीम आणि पोलिसांच्या समन्वयातून ही रेस्क्यू मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. दरम्यान, परिसरात बिबटय़ाचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी मिरजगाव परिसरातील एक लहान मुलगा कॅनॉलजवळ गेला असता, त्याला बिबटय़ा पाण्यात अडकलेला असल्याचे दिसले. घाबरून गेलेल्या मुलाने तत्काळ घरी जाऊन ही माहिती दिली. काही क्षणांतच ही बातमी मिरजगाव परिसरात पसरली. बिबटय़ाला पाहण्यासाठी कॅनॉल परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मिरजगावच्या अगदी जवळ बिबटय़ा आढळल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाला तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर वन परिक्षेत्र कर्जत (प्रा.), रेस्क्यू टीम दौंड आणि वन परिक्षेत्र मिरजगाव यांनी संयुक्तपणे रेस्क्यू मोहीम हाती घेतली.
वन परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके आणि संकेत ऊगले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रवीण सोनवणे, सचिन गांगर्डे यांच्यासह वनरक्षक सुरेश भोसले, रवि राठोड, सागर वाघचौरे, शांतिनाथ सपकाळ, चंद्रकांत मरकड, नागेश तेलंगे, दिनकर लिलके, काळेसाहेब, गंगासागर गोटमुकले, चित्रा शिद, घोडके मॅडम, किसन नजन, किसन बोबडे, ऋषिकेश लोखंडे, माळशिखरे, महारनवर, सूर्यवंशी यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
बिबटय़ाला कोणतीही इजा होऊ न देता, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत पिंजऱयाच्या सहाय्याने त्याला कॅनॉलमधून बाहेर काढून जेरबंद करण्यात आले. दरम्यान, मिरजगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक विजय झंझड यांनीही गर्दी नियंत्रणात ठेवत रेस्क्यू कार्यात मोलाची मदत केली. दरम्यान, परिसरात बिबटय़ांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांमध्ये सतर्कतेची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
























































