…तो आला पिंजऱ्यात अडकला…अन् पिंजरा तोडून धूम ठोकली; बिबट्याचा थरार सीसीटिव्हीत कैद

राहुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बारागाव नांदूर येथील सचिन लक्ष्मण म्हसे यांच्या शेतामध्ये पाच बिबट्यांचा वावर आढळून आला होता. त्यानंतर या बिबट्यांबाबत सचिन यांनी वन विभागाला माहिती दिली होती. वनविभागाने या ठिकाणची पाहणी करून म्हसे यांच्या शेत वस्तीवर 1 पिंजरा लावला होता. पिंजरा बसवल्यानंतरही महिन्याभरात या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला नाही. त्यानंतर शनिवारी रात्री 2.50 वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यात बिबट्या अडकला. बिबट्या अडकल्यानंतर त्याच्या आवाजाने दुसरा बिबट्याही तेथे आला. तो पिंजऱ्याभोवताली फिरताना सिसिटीव्ही मध्ये कैद झाला.अडकलेल्या बिबट्याने पिंजऱ्याच्या दरवाजाला धडका मारुन वन विभागाच्या कुचकामी पिंजऱ्याचा दरवाजा तोडला आणि धूम ठोकली, ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रविवारीही आणखी एक बिबट्या पिंजऱ्यातून सटकला आहे. त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे. सचिन म्हसे यांच्या शेतवस्तीच्या आसपास बिबटे असल्याचे सीसीसीटिव्ही मध्ये कैद झाले असल्याने वन विभागाने चांगल्या स्थितीतील पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नविन अधुनिक पद्धतीचे पिंजरे खरेदी करावेत, जेणेकरुन पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पुन्हा पिंजऱ्याच्या बाहेर येणार नाही.राहुरी शहरापासून जवळच बिबट्यांचा वावर असल्याने कालांतराने शहरात देखील या बिबट्यांचा उपद्रव होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.