कोल्हार-बेलापूर रस्त्यालगत तीन बिबट्यांचा मुक्त संचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्याच्या कोल्हार-बेलापूर रस्त्यालगतच्या लोकवस्तीजवळ तीन बिबट्यांचा सकाळपासून मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे परिसरतील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. कोल्हार बुद्रुक व कोल्हार खुर्दमधील नागरिक फटाके वाजवून बिबट्यांना हुसकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सध्या याच दोन्ही गावांच्या सीमेवर बिबट्यांनी मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे कोरोनापाठोपाठ बिबट्यांमुळे कोल्हारवासीयांना घरात कैद व्हावे लागत आहे.

मंगळवारी सकाळीच साडेसातच्या सुमारास बेलापूर रोडलगत विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे यांच्या कापूस शेतात व संजय बांगरे यांच्या शेतामध्ये तीन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांनी एकच धसका घेतला. अनेकांनी काठय़ा घेऊन बिबट्याला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन तासांनंतर पुन्हा हेच बिबटे या परिसरात दिसून आले. राऊत वस्ती व कोल्हार येथील युवकांनी फटाके वाजवून त्यांना हुसकाविले. मात्र, त्याच वेळी प्रवरा नदीपात्राच्या पलीकडे असलेल्या कोल्हार खुर्दमधील सावध झालेल्या ग्रामस्थांनी फटाके वाजविण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिबट्यांना नदीपार जाता येत नव्हते. कोल्हारमध्येही फटाके वाजवीत असल्याने त्यांची कोंडी झाल्याने बिबट्यांनी परिसरातीलच एका शेतात तळ ठोकला आहे.

एका बाजूला बेलापूर रोडवरील राऊतवस्ती, दुसर्‍या बाजूला कुंकुलोळ संकुलाच्या इमारती, तिसर्‍या बाजूस नदीपात्र अन् चौथ्या बाजूला शहानगरमधील लोकवस्ती अशा चहूबाजूने बिबट्याचे कुटुंब अडकले आहे. आधीच कोरोनामुळे घरात कैद झालेल्या येथील ग्रामस्थांना आता बिबट्याच्या दहशतीने पुन्हा घरात कैद होण्याची वेळ आली आहे.

बिबटे तीन अन् पिंजरा अवघा एक!

वन विभागाचे कर्मचारी जी. बी. सुरासे या ठिकाणी पोहोचले असून, येथे पिंजरा लावण्यात आला आहे. बिबटे तीन असल्याने कोल्हार ग्रामपंचायतीने परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. वन विभागाने जवळ असलेला एक पिंजरा येथे तातडीने लावून कार्यतत्परता दाखविली आहे. मात्र, तीन बिबटे कोल्हारच्या लोकवस्तीलगत मुक्त संचार करीत असताना एका पिंजर्‍यात तीन बिबटे जेरबंद होणार का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.