पिंजऱ्याच्या लाकडी पट्टय़ा तोडून बिबटय़ा पसार; कोपरगावात प्रशासनाचा गलथान कारभार

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला जीवदान देऊन विहिरीतून पिंजऱयाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. मात्र, बाहेर येताच, बिबटय़ाने पिंजऱयाच्या मागील बाजूच्या लाकडी पट्टय़ा तोडून बिबटय़ा सर्वांसमोर पिंजऱयातून पसार झाला आहे. त्याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे. मात्र, तो सापडला नसल्याने वन विभागाचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे. एवढय़ा मजबूत पिंजऱयातून बिबटय़ा बाहेर आल्याने एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले.

कोपरगाव तालुक्यातील दशरथवाडीजवळ घनघाव वस्ती येथे आज सकाळी गौतम घनघाव यांच्या विहिरीत बिबटय़ा पडल्याचे निदर्शनास आले होते. येथील स्थानिक नागरिकांनी पोलीस व वन विभागाला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर वन विभागाची रेस्क्यू टीम दुपारी 2 वाजता घटनास्थळी पोहोचली.

दरम्यान, बिबटय़ाची माहिती समजताच, गावकऱयांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली होती. गावकऱयांनी बिबटय़ासाठी विहिरीमध्ये दोरीच्या साहाय्याने बाज टाकली होती. जीव वाचविण्यासाठी बिबटय़ा बाजेवर चढून बसला होता. गावकऱयांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बिबटय़ाला जीवदान मिळाले. दुपारी दोननंतर वन विभागाचे अधिकारी आले. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. बिबटय़ाला पकडण्यासाठी वन विभागाने गावकऱयांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला. त्या पिंजऱयात बिबटय़ाला पकडण्यात आले. मात्र, पिंजरा विहिरीच्या वरती काढण्यात आला, तेव्हा बिबटय़ाने पिंजऱयाच्या मागील बाजूस लावलेली लाकडी फळी तोडून सर्वांसमोर धूम ठोकली.

या घटनेने गावकऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाचीही चांगलीच धांदल उडाली आहे. वन विभागाकडे एवढा निकृष्ट दर्जाचा पिंजरा जर उपलब्ध असेल तर खरंच कोपरगावचे वन विभाग खाते बिबटय़ा पकडण्यास सक्षम आहेत की नाही, यावर गावकऱयांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यातून वन विभागाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे.