आता रोगराईचे महासंकट, महाडमध्ये लेप्टो आणि कोरोनाचे रुग्ण

महाड तालुक्यात पूर ओसरल्यानंतर आता रोगराईचे महासंकट घोंघावू लागले आहे. शहरात, गावात, दुकानात आणि घरात सगळीकडे चिखलाचे साम्राज्य, कचऱयाची दुर्गंधी पसरली असतानाच 19 जणांना लेप्टोस्पायरोसीस, दोघांना डेंग्यू तर दोघांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यातच कोरोनाचे तीन रुग्ण सापडल्याने रुग्णवाढीचा धोका वाढला आहे.

 22 आणि 23 जुलैच्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीला पूर येऊन महाड शहर आणि तालुका पाण्याखाली गेला होता. पूर ओसल्यानंतर महाड शहरात गेल्या आठ दिवसांपासून स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याने शहरासह तालुक्यात 18 ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे सुरू करण्यात आली आहे. या शिबिरात 12 हजार 931 नागरिकांना तपासण्यात आले. त्यात 19 जणांना लेप्टोस्पायरोसीसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.  380 जणांची ऑण्टिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. दोघांना डेंग्यू तर दोघांना मलेरिया झाला असून एकूण 1 हजार 416 जणांना टिटॅनेसचे इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. डॉक्सीसायक्लीनच्या गोळय़ांसह लहान मुलांचा डायरियापासून बचाव करण्यासाठी ओआरएस आणि प्रतिबंधात्मक गोळय़ांचे वाटपही करण्यात आले आहे.

तळिये गावचे 90 गुंठे जागेत तात्पुरते पुनर्वसन होणार

तळियेतील दरड दुर्घटनेत 32 घरे गाडली गेली आणि 84 बळी गेले. मृतांचे नातेवाईक बेघर झाल्याने आता तळिये  गावाजवळच सुरेखा म्हस्के यांची 90 गुंठे खासगी जागेची पाहणी आज प्रशासनातर्फे करण्यात आली. सुरेखा म्हस्के यांनी तळिये ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाला तत्काळ लेखी ’ना हरकत’ दिली आहे. त्यामुळे या जागेवर तळियेवासीयांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या