गुजरातमध्ये कोरोनाच्या चाचण्यांचा गोंधळ, अहमदाबाद मेडिकल असोसिएशनची कोर्टात धाव

2721
corona-test-11

गुजरातमध्ये अनेक ठिकाणी कोरोनाची लक्षणे असताना रुग्णांची कोरोना चाचणीच होत नाहिये. कोरोनाची संख्या लपवण्यासाठी हे सुरू आहे आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे.

अहमदाबादमध्ये अनेक खासगी आणि नॉन कोविड रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल होत आहे. अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. परंतु त्यांची चाचणी करण्याचे कुठलेच धोरण नसल्याची प्रतिक्रिया धवनी रुग्णालयाचे संचालक डॉ. वसंत पटेल यांनी दिली आहे. कुठल्याही शस्त्रक्रियेपूर्वी कोरोनाची चाचणी गरजेचे आहे अशी ICMR ची नियमावली आहे. परंतु याबाबत गुजरात सरकार याबाबत असंवेदनशील असल्याने पटेल यांनी म्हटले. तसेच त्यामुळे डॉक्टर आणि नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी अहमदाबाद मेडिकल असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनासदृश आजाराने मृत्यू, कारण अस्पष्ट
अहमदाबादमध्ये शांताबाई शहा या 92 वर्षीय आजींना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 21 मे पासून त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. 23 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा विजयभाई यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजयभाईंना आपल्या आईचे अंत्यदर्शनही करता आले नाही. या प्रकरणात दोघांची कोरोनाची टेस्ट झाली नाही. अहमदाबाद मिररने याबाबत वृत्त दिले आहे. शहा कुटुंबीयांनी या प्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. तसेच कमी कोरोना टेस्ट केल्यामुळे आकडाही कमी होईल म्हणून राज्य सरकार टेस्ट करत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केले आहे. शांताबाई शहा यांचा मृत्यू कशामुळे झाला हे आता कळणारच नाही अशी खंत त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील खासगी प्रयोगशाळांना कोरोना टेस्ट करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. कोरोना टेस्ट करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी गरजेचे आहे. या प्रकरणात एक मुद्दा असा मांडला जात आहे की, जर जास्तीत जास्त कोरोना टेस्ट केल्या तर राज्यातील 70 टक्के कोरोनाचे रुग्ण आढळू शकतात त्यामुळे राज्यात एकच गोंधळ निर्माण होऊ शकतो. असे असले तरी खासगी प्रयोगशाळांना चाचणी करण्यास बंदी घालणे चुकीचे असल्याने उच्च न्यायालयाने म्हटले होते.

कमी टेस्ट, कमी आकडे राज्य सरकारचे धोरण?
कोरोनाच्या टेस्ट कमी केल्या तर कोरोनाचे आकडे कमी दाखवता येतील असे राज्य सरकारचे धोरण आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण गेल्या काही दिवसांत झालेल्या कोरोना टेस्टची आकडेवारी

आज तकने दिलेल्या याबाबत वृत्त दिले आहे. गुजरात सरकारने दिलेल्या आकड्यांनुसार 17 ते 24 मे दरम्यान सरासरी 5 हजार कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. पण 25 मे रोजी 3 हजार 492 तर 26 मे रोजी 2 हजार 952 टेस्ट करण्यात आल्या होत्या. गुजरात सरकार कोरोना प्रकरणी नागरिकांच्या आयुष्याशी खेळत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची टेस्ट होत नसल्याने डॉक्टरांच्याही जिवाला धोका असल्याचे डॉक्टर भरत गढवी यांनी सांगितले. खासगी प्रयोगशाळेत चाचणी केल्यास त्याचे रिपोर्ट लवकर येतात. त्यामुळे रुग्णाला तसे उपचारही देता येतात. परंतु खासगी प्रयोगशाळेत चाचणी न केल्यास संपूर्ण मेडिकल टीमला नंतर क्वारंटाईन करावे लागतं असे डॉ. गढवी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या