चला, गद्दारांना गाडू या, विधानसभा जिंकू या! कोल्हापूर शिवसेनेचा निर्धार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात ‘इंडिया’ आघाडीचे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे यश हे सर्व पक्षांचे नेते, स्वाभिमानी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांचे आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्यासह ‘चला, गद्दारांना गाडू या, विधानसभा जिंकू या!’ असा जबरदस्त निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात  आला.

शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर मनपा क्षेत्रातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार होते. यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयासाठी आणि गद्दारांना गाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेल्या शिवसैनिकांचे अभिनंदन करण्यात आले.

‘लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत भाजपचा ‘400 पार’चा नारा तडीपार केला. याचा फायदा महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना झाला. महाविकास आघाडीचे निवडणुकीतील यश हे सर्व घटकपक्षांचे नेते व स्वाभिमानी कार्यकर्त्यांचे आहे. त्यामुळे आता ‘चला, गद्दारांना गाडू या, विधानसभा जिंकू या’ हा नारा देत आगामी विधानसभेसाठी सज्ज राहा. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करून काम करा, नवीन मतदार नोंदणी, गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक, भगवा सप्ताह आदी कामांची तयारी करा, अशा सूचना संजय पवार यांनी दिल्या. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने, कमलाकर जगदाळे, संजय जाधव, शंकर खोत, केदार वाघापूरकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत बीडकर, युवराज खंडागळे, सुरेश कदम, राहुल माळी, राजू जाधव, स्वरूप मांगले, नियाज खान, सुहास डोंगरे, विष्णू पोवार, राजेंद्र पाटील, स्मिता सावंत, दीपक गौड, अमर जाधव, महादेव कुकडे, उदय जाधव आदी उपस्थित होते.