मदुराई एलआयसी आग प्रकरण – महिला अधिकाऱ्याचा मृत्यू नव्हे तर तो होता नियोजित कट, आरोपीला अटक

तामिळनाडूच्या मदुराई येथील एलआयसी कार्यालयात डिसेंबर 2025 मध्ये लागलेली आग हा अपघात नसून एक भीषण हत्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आपल्या कामातील भ्रष्टाचार आणि अनियमितता उघड होऊ नये या भीतीने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी टी. राम याने महिला अधिकारी कल्याणी नंबी (54) यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळले. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा बनाव रचणाऱ्या आरोपीला तामिळनाडू पोलिसांनी 17 जानेवारी 2026 रोजी अटक केली आहे.

कल्याणी नंबी यांची नुकतीच तिरुनेलवेली येथून मदुराई येथील पश्चिम पेरुमल मेस्त्री स्ट्रीटवरील एलआयसी कार्यालयात बदली झाली होती. कामावर रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रलंबित फाईल्सची तपासणी केली असता, त्यांना मृत्यूच्या दाव्यांच्या निकाली प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली. या तपासात आरोपी राम याच्याकडे 40 हून अधिक मृत्यूचे दावे प्रलंबित असल्याचे समोर आले होते. कल्याणी यांनी याप्रकरणी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची ताकीद दिली होती. आपली नोकरी जाण्याच्या भीतीने रामने कल्याणी यांचा काटा काढण्याचे ठरवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामने मोठ्या शिताफीने हा कट रचला होता. घटनेच्या दिवशी त्याने कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आणि कोणालाही बाहेर पडता येऊ नये यासाठी मुख्य दरवाजाला बाहेरून साखळ्या लावल्या. कल्याणी आपल्या केबिनमध्ये असताना त्याने त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. या आगीत कल्याणी यांचा मृत्यू झाला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने संबंधित फाईल्सही जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अपघाती वाटावा यासाठी त्याने स्वतःलाही आग लावून घेतली होती. मात्र तो थोडक्यात वाचला. सुरुवातीला एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर रामने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी रामविरुद्ध हत्या, पुरावे नष्ट करणे आणि दिशाभूल करणारी माहिती देणे यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने संपूर्ण विमा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.