पुलावरील शेवाळातून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

610
file photo

बोरी नदीवरील पुरमेपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी बोरीला पुन्हा पूर आला. निमगूळ येथील तळफरशीवरून पुराचे पाणी दिवसभर वाहिले. यंदाच्या पावसामुळे तळफरशीवर ठिकठिकाणी शेवाळ निर्माण झाले आहे. मात्र या पुलावरील प्रवास निमगूळ ग्रामस्थांसाठी जीवघेणा ठरत आहे. जनावरांनाही जीव गमवावा लागत आहे. शेवाळावरून बैलगाडी घसरल्याने जुंपलेल्या बैलांपैकी एका बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या दिवशी याच पुलावरून पाय घसरून पडल्याने गाईचा मृत्यू झाला. पुलाच्या दोन्ही बाजूस दोर बांधून नागरिक सध्या पुलाचा वापर करीत आहेत. या पुलाची उंची वाढवावी अशी  जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हय़ातील सरासरी पर्जन्यमान 546 मिलिमीटर आहे. सुमारे चार वर्षांनंतर यंदा पहिल्यांदा पाऊस सरासरी गाठत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाला सुरुवात झाली. गेल्या दीड महिन्यात टप्प्याटप्प्याने सर्वत्र पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील नदी-नाले खळखळू लागले आहेत. पावसाच्या हजेरीनंतर धरणांच्या साठय़ात वाढ होऊन नदीपात्रातून पुराचे पाणी वाहते. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने समस्या निर्माण केल्या आहेत. पुरमेपाडा येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने बोरी नदीला पुन्हा पूर आला. धुळे तालुक्यातील निमगूळ या गावाजवळून बोरी नदी वाहते. ग्रामस्थांना नदीच्या पलीकडे शेती आणि खळवाडीत जावे लागते. त्यासाठी बोरी नदीवर कमी उंचीची तळफरशीवजा पूल उभारण्यात आला आहे, परंतु गेल्या दीड महिन्याच्या पावसामुळे आणि नदीच्या पाण्यामुळे तळफरशीवर ठिकठिकाणी शेवाळ निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी सायंकाळी शेतातून परत येणारी बैलगाडी शेवाळावरून घसरली. त्यामुळे बैलगाडीला जुंपलेल्या जोडीपैकी एक बैल जागीच मरण पावला. दुसऱया दिवशी सकाळी शेताकडे जाणारी गाय याच तळफरशीवरून पाय घसरून पडली आणि मरण पावली. नदीच्या दुसऱया तटावर निमगूळची काही नागरी वसाहत आहे. या दोन्ही वसाहतींना जाण्यासाठी तळफरशीचा वापर होतो. शेवाळामुळे तळफरशी धोकादायक झाल्याने आता ग्रामस्थ दोर बांधून तळफरशीचा वापर करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी उंच पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या