
जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलाना लाईफ गार्डस्नी वाचवले आहे. सांताक्रूझ पोलिसांनी त्या तिन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
नुकतेच जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी आलेले तीन जण बुडाल्याची घटना घडली होती. त्याची गंभीर दखल घेण्यात आली होती. आज समुद्राला भरती असल्याने जुहू चौपाटीवर खबरदारी घेण्यात आली होती.
सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ओहोटी सुरू झाल्यावर जुहू कोळीवाडा येथील गेट उघडण्यात आला. त्याच वेळी सांताक्रूझ येथे कलिना मिलिटरी कॅम्प येथे राहणारी तीन अल्पवयीन मुले पोहण्यासाठी समुद्रात गेली. त्याना पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. हा प्रकार गस्तीवर असलेले लाईफ गार्ड मनोहर शेट्टी, प्रशांत भोईर, संतोष तांडेल, हार्दिक मर्दे यांच्या लक्षात आला. लाईफ गार्डनी समुद्रात धाव घेऊन बुडणाऱया त्या मुलांना सुखरूप बाहेर काढले. याची माहिती सांताक्रूझ पोलिसांना दिली.



























































