
देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा सन्मान करत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील शौर्य पुरस्कार विजेत्यांना आता एसी डब्यांमध्ये आजीवन मोफत प्रवास मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत एक आदेश जारी केला आहे. हा निर्णय म्हणजे शूर सैनिकांना दिलेली ही एक आदरांजली आहे.
ही सुविधा केवळ सेनिकांपुरतीच मर्यादित नाही. यामध्ये त्यांच्या कुटुंबांचाही समावेश आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील शौर्य पदक विजेते अधिकारी आणि सैनिक तसेच शहीद किंवा दिवंगत सैनिकांचे जोडीदार, अविवाहित मरणोत्तर सन्मानित सैनिकांचे पालक या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
याआधी ही सुविधा केवळ परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र पुरस्कारप्राप्त सैनिक, अधिकाऱ्यांसाठीच उपलब्ध होती. या नवीन आदेशात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शौर्य पदकांचाही समावेश आहे.
या निर्णयामुळे सशस्त्र दलातील जवानांचे मनोबल वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासन लवकरच पात्र लाभार्थ्यांना मोफत आजीवन रेल्वे पास/कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.





























































