वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचंय, खा ‘हे’ तांदूळ

वजन कमी करण्यासाठी आहारात कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात. पोळी आणि भात या दोन पदार्थांत कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्याकरिता आहारात भात आणि पोळीचा समावेश करणे टाळले जाते. अशा वेळी ‘लाल तांदळा’चा पर्याय निवडण्यास हरकत नाही. लाल तांदळामध्ये फायबर, अँण्टीऑक्सिडंट्स, एंथोसायनिन आणि फ्लेवोनोइड भरपूर प्रमाणात असते. हे घटक आरोग्यासाठी गुणकारी आहेत. लाल तांदूळ हा नैसर्गिकरित्या तयार करण्यात आल्यामुळे तो पांढऱ्या तांदळासारखा पॉलिश केलेला नसतो. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठीही आहारात या तांदळाचा समावेश करणे गुणकारी ठरते याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. जाणून घेऊया वजन घटवण्यासाठी रोजच्या जेवणात लाल तांदूळ खाणे का गरजेचे आहे, याविषयी-

भरपूर फायबरयुक्त
विविध प्रकारच्या तांदळाच्या जातीमध्ये सम प्रमाणात कार्बोहायड्रेड्स् आणि प्रथिने असतात, मात्र लाल तांदळामध्ये पोषक तत्त्वे आणि फायबर जास्त प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी या घटकांचा फायदा होतो. इतर तांदळाच्या प्रकारांपेक्षाही यामध्ये पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात आढळतात याशिवाय चवीलाही तो अत्यंत रुचकर असतो.

फॅट बर्न करण्यासाठी गुणकारी
लाल तांदळामध्ये असे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरात साचलेला अतिरिक्त मेद कमी करण्यासाठी फायदा होतो. या तांदळात कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात. शरीरातील उत्साह वाढवण्याकरिता हा फायदेशीर आहे. यामध्ये कमी प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असतात ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी याची मदत होते.

वाफेवर शिजवल्याने होते पोषण
लाल तांदूळ पौष्टिक होण्याकरिता वाफेवर शिजवावा. यामुळे त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होत नाहीत. कोणत्याही प्रकारचा तांदूळ कुकरमध्ये शिजवण्याऐवजी पातेल्यात शिजवावा. यामुळे गॅस विकार निर्माण होत नाहीत.