
साउथ इंडियन पाककृतींमध्ये सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे इडली-डोसा आज हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतो. इडली डोसा हा पदार्थ सहज मिळतो, मुख्य म्हणजे हा आरोग्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो.
साउथ इंडियन अन्नपदार्थांमध्ये केवळ इडली-डोसाच नाही तर, इतर अनेक पदार्थही आहेत. हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठीही तितकेच गरजेचे आहेत. साउथ इंडियन पाककृतींबद्दल एक खास गोष्ट म्हणजे अन्न तळण्याऐवजी ते वाफवले जाते, ज्यामुळे ते आरोग्यदायी पर्याय म्हणून जेवणात समावेश केला जातो.
केरळमध्ये अनेक विविध प्रसिद्ध पदार्थ आढळतात. बहुतेक पदार्थांमध्ये डाळी, भात, केळी किंवा पपईचा वापर केला जातो. यामुळे हे पदार्थ आरोग्यदायी असतात आणि पचायलाही सोप्या असतात. पण आज आपण पारंपारिक डोस्याऐवजी काही अनोख्या आणि चविष्ट पदार्थांबद्दल जाणून घ्या.
रवा उत्तपम
हा एक आरोग्यदायी आणि चविष्ट नाश्त्याचा पर्याय असू शकतो. हे बनवण्यासाठी रवा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची बारीक चिरुन घ्या त्यानंतर एका भांड्यात दही आणि रवा मिसळा. नंतर त्यात मीठ आणि मसाले घाला. चिरलेल्या गोष्टी घाला आणि चांगले मिक्स करा. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि पॅनमध्ये मिश्रण पसरवा आणि दोन्ही बाजूंनी चांगले खरपूस भाजून घ्या. तुम्ही रवा उत्तपम सांबार, टोमॅटो चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.
गव्हाचा डोसा
गव्हाचा डोसा तुमच्या नाश्त्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. गव्हाचा डोसा बनवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडे पाणी घालून नंतर त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, आले घाला आणि नंतर ते पीठ तव्यावर डोसासारखे पसरवा आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
वेन पोंगल
ही डिश पोंगल भात आणि मूग डाळीपासून बनवली जाते. पोंगल भात आणि पिवळी मूग डाळ तुपात भाजून घ्या. नंतर त्यात काळी मिरी, आले आणि कढीपत्ता घालून मिक्स करा आणि पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्या. तसेच या पोंगलला तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये घी, जिरे, हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, काजू आणि कडीपत्ता घालून हा तडका पोंगलमध्ये घाला ज्यामुळे पोंगलची चव अजून वाढेल. हा एक अतिशय पौष्टिक नाश्ता आहे जो ऊर्जा वाढवण्यास मदत करतो. पोंगल तुम्ही नारळाची चटणी किंवा टमाटर चटणी सोबत सर्व्ह करा.
अप्पम
अप्पम बनवण्यासाठी, तांदूळ आणि सम प्रमाणात मसूर डाळ,चण्याची डाळ, मूगाची डाळ, आणि उडदाची डाळ आणि मेथी दाणे 5 ते 6 तास भिजवून ठेवा त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटूण घ्या. एका भांड्यात हे मिश्रण घेऊन काही वेळासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवा त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसून घेतलेलं आलं, जिरं आणि मीठ घालून सर्व मिश्रण मिक्स करा. तुम्हाला आवडत असल्यास त्यामध्ये तुम्ही शिमला मिरची, वाटाणा, गाजर देखील घालू शकता. अप्पे पात्रात तेल घालून हे मिश्रण घाला आणि व्यवस्थित झाकण ठेऊन एका बाजूने भाजून घ्या तसेच दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्या. आणि गरमागरम शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
पुट्टू
पुट्टू हा केरळमधील प्रसिद्ध नाश्त्यांपैकी एक आहे. तो तांदूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. नारळ घालून वाफेवर शिजवले जाते. तुम्ही ते चणा किंवा केळीच्या भाजीसोबत खाऊ शकता. तुम्ही ते नाचणी आणि बाजरीच्या पिठापासून देखील बनवू शकता. हे बनवण्यासाठी एका भांड्यात भिजवलेले पोहे, भाजलेला रवा आणि मिठ घालून मिक्स करा. त्यानंतर पुट्टू पात्रात किसलेलं खोबऱ्याचा एक थर लावून त्यानंतर पोहे आणि रव्याचं मिश्रणाचा एक थर लावून घ्या असेच 2 ते 3 थर लावून हे पुट्टू शिजवून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.

































































