केस हे प्रत्येक व्यक्तीची सुंदरता आणि आत्मविश्वास वाढवण्याचे काम करत असतात. तसेच केसगळतीच्या समस्या विशेषत: तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आणि हेअर ट्रान्सप्लांट हे नवीन केस उगवण्याचे प्रसिद्ध असे तंत्र आहे. केसगळती ही समस्या फक्त वृद्धांपुरतीच मर्यादित राहिली नसून तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि हे तंत्रज्ञान पूर्वी फक्त सेलिब्रिटी आणि श्रीमंत वर्गात प्रचलित होते. परंतु आता मध्यमवर्गीय लोकही मोठ्या प्रमाणावर त्याचा अवलंब करत आहेत. हेअर ट्रान्सप्लांटबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय?
हेअर ट्रान्सप्लांट ही एक शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये डोक्याच्या मागच्या भागातून किंवा डोक्याच्या इतर कोणत्याही भागातून केस काढून ते केस नसलेल्या किंवा कमी असलेल्या ठिकाणी लावले जातात. सामान्यतः केस दाट असलेल्या ठिकाणाहून केस काढले जातात आणि टक्कल पडलेल्या ठिकाणी त्यांचे पुनर्रोपण केले जातात.
डोक्याच्या मागच्या बाजूचे केस का काढले जातात?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डोक्याच्या मागच्या बाजूचेच केस काढले जातील, असं नाही. केस कोणत्याही भागातून काढता येतात. मात्र, मागच्या बाजूचे केस दाट असल्याने ते कमी झाल्याचे दिसून येत नाही. आणि मागच्या केसांची लांबी आणि गुणवत्ता बाकीच्या भागांपेक्षा चांगली असते. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करताना डोक्याच्या मागच्या बाजूच्या केसांचा अधिक वापर केला जातो.
हेअर ट्रान्सप्लांट किती वेळा केलं जाऊ शकतं?
हेअर ट्रान्सप्लांट किती वेळा केले जाऊ शकते? हे तुमच्या डोनर एरियावर अवलंबून असते. तुमच्या डोनर एरियात पुरेसे केस असल्यास तुम्ही दोन ते तीन वेळा हेअर ट्रान्सप्लांट करू शकता. तथापि, प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया करताना दाट केस कमी होऊ शकतात.
हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी काय जाणून घ्यावे?
हेअर ट्रान्सप्लांट ही एक परिणामकारक प्रक्रिया ठरू शकते. परंतु त्याचे परिणाम अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. जसं की कौटुंबीक इतिहास, डोनर एरियाची स्थिती आणि ट्रान्सप्लांटनंतरची काळजी. त्यामुळे या प्रक्रियेचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.