मेस्सी-सुआरेझची जोडी रॅम्पवर! जगज्जेता कर्णधार वर्ल्ड कपच्या आठवणींचा लिलाव करणार

अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनल मेस्सी हिंदुस्थान दौऱयावर येत असून त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. कोलकात्यापासून सुरू होणारा हा दौरा मुंबई, हैदराबाद आणि नवी दिल्लीपर्यंत रंगणार आहे. मुंबईत मेस्सी धर्मार्थ उपक्रमासाठी फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करणार आहे. तसेच त्याच्यासोबत त्याचा सहकारी लुईस सुआरेझही सहभागी होईल. आयोजकांनी मेस्सीकडे 2022 फिफा विश्वचषक जिंकल्याच्या आठवणींची काही स्मृतिचिन्हे लिलावासाठी मागितली आहेत.

‘जीओएटी हिंदुस्थान दौरा 2025’चे प्रवर्तक सतादरू दत्त यांनी सांगितले की, 14 डिसेंबर रोजी रात्री 45 मिनिटांचा हा विशेष कार्यक्रम मुंबईत होईल. या कार्यक्रमात मेस्सी, सुआरेझ आणि रोड्रिगो डी पॉल रॅम्पवर वॉक करतील.

कोलकात्यात मेस्सीचा भव्य पुतळा

कोलकाता टप्प्यात मेस्सीचा आतापर्यंतचा सर्वात उंच 70 फुटांच्या पुतळय़ाचे अनावरण सुरक्षेच्या कारणास्तव थेट हॉटेलमधून व्हर्च्युअल पद्धतीने केले जाणार आहे. आठ वेळचा सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कार विजेता मेस्सी शनिवारी मध्यरात्री 1.30 वाजता कोलकात्यात दाखल होईल. प्रायोजकांसाठी खास भेट-कार्यक्रम सकाळी 9.30 ते 10.30 होईल. सॉल्ट लेक स्टेडियमवर दुर्गापूजेसाठी तयार केलेले त्याचे भव्य भित्तिचित्रही त्याला सुपूर्द केले जाणार आहे.

नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट

हैदराबादनंतर मेस्सी नवी दिल्लीत जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. तेथे नऊ सदस्यांचा खास सेलिब्रिटी सामनादेखील होईल. 2011 नंतर प्रथमच हिंदुस्थानात येणाऱया मेस्सीचा हा दौरा 15 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे मंजूर झाला होता.

वानखेडेवर भव्य कार्यक्रम

मुंबईत सायंकाळी 5 वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार असून त्याआधी क्रिकेट क्लब ऑफ इंडियात साडेतीनपासून ‘पेडल कप’ होईल. हा फॅशन शो पूर्णतः धर्मार्थ हेतूने आयोजित करण्यात आला आहे. सुआरेझ संगीत कार्यक्रमातही सहभागी होणार असून, मेस्सीकडून 2022 च्या वर्ल्ड कपमधील स्मृतिचिन्हांचा लिलाव करण्याची औपचारिक विनंती करण्यात आली आहे.