दारू पिण्यासाठी शाळेच्या सहलीसह शिक्षकांची ‘नेपाळ’स्वारी

52

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहार येथे दारुबंदी लागू असली तरी तळीराम मात्र दारू पिण्याचे नवनवीन बहाणे शोधत असल्याचं दिसत आहे. दारू पिता यावी म्हणून बिहारच्या शिक्षकांनी शैक्षणिक सहल घेऊन चक्क नेपाळ गाठल्याची घटना घडली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, बिहारमधील कटिहार येथील बावनगंज मिडल स्कूलची शैक्षणिक सहल जाणार होती. मुख्यमंत्री बिहार दर्शन योजनेअंतर्गत ४४ विद्यार्थ्यांना २४ मे रोजी भागलपूर येथील विक्रमशिला येथे नेण्यात येणार होतं. मात्र, मुख्याध्यापक रवींद्र कुमार, शिक्षक राधेश्याम सिंह, अमित कुमार रजक, विकास कुमार रजक, अशोक रजन आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी नूर आलम यांनी दारू पिण्यासाठी विद्यार्थ्यांची बस घेऊन थेट नेपाळ गाठलं.

नेपाळमध्ये अररिया नगर येथे जोगबनी या ठिकाणी आल्यानंतर बस थांबवण्यात आली. विद्यार्थी आणि महिला आचाऱ्याला बसमध्येच थांबायला सांगून हे पाचही जण निघून गेले. तासाभराने ते सगळे मद्यधुंद अवस्थेत परत आले. परत आल्यानंतर त्यांनी बसमध्येच उलट्या केल्या. त्यानंतर विद्यार्थी आणि आचाऱ्याकडून बस साफ करून घेतली. या विद्यार्थ्यांमध्ये २४ मुलीही होत्या. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेत निदर्शनं केली.

पालकांच्या वाढत्या विरोधामुळे पोलीसही शाळेत दाखल झाले. पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या शिक्षकांविरोधात लेखी तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या