भायखळा जेलमध्ये साक्षरता मिशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश सौंदाळकर । मुंबई

गंभीर ते किरकोळ गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या निरक्षर महिला आता साक्षर होऊ लागल्या आहेत. अंगठेबहाद्दर महिला आता सही करण्यापासून ते मराठी, इंग्रजी वाचू-लिहू लागल्या आहेत. भायखळा कारागृहात सुरू असलेल्या साक्षरता वर्गामुळे आतापर्यंत 25 महिला कैदी या साक्षर झाल्या आहेत.

राज्यात 9 मध्यवर्ती, 31 जिल्हा, 19 खुली आणि 172 उपकारागृहे आहेत. तर पुणे आणि भायखळा येथे महिलांकरिता स्वतंत्र कारागृहे आहेत. दक्षिण विभागातील भायखळा कारागृह हे महत्त्वाचे कारागृह मानले जाते. गंभीर गुन्ह्यापासून ते किरकोळ गुन्ह्यात शिक्षाधीन महिलांना भायखळा कारागृहात ठेवले जाते. सध्या या तुरुंगात 400 महिला आणि 27 मुले (परदेशी, बांगलादेशी, भारतीय महिला) आहेत. कारागृहात काही महिला या निरक्षर आहेत. अंगठेबहाद्दर महिलांना कारागृहातून बाहेर पडताना जामिनाच्या अर्जावर सही कोठे करायची हे सांगावे लागायचे. लिहिता-वाचता येत नसल्याने महिलांची अडचण व्हायची. याची दखल तुरुंग अधीक्षक अरुणा मुरगूटराव यांनी घेतली. त्यानुसार कारागृहात साक्षरता वर्ग सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे कारागृहात काही शिक्षित महिला सध्या शिक्षाधीन आहेत. निरक्षर महिलेला साक्षर करण्याची जबाबदारी शिक्षित महिलांना दिली गेली. कारागृहात साक्षरता वर्ग सुरू करण्यात आला. दुपारी 12 ते 3 या वेळात बॅरॅकमध्ये साक्षरता वर्ग चालतो. साक्षरता वर्गामुळे आता निरक्षर महिला या चांगल्या प्रकारे लिहू-वाचू लागल्या आहेत. तर कारागृहात काही परदेशी महिलादेखील आहेत. साक्षर झालेल्या महिला परदेशी महिलांशी जमेल तसे इंग्रजीमध्ये संवाद साधतात.

अर्धा तास पुस्तकवाचन
भायखळा कारागृहात वाचनालय आहे. महापुरुषांपासून ते साहित्यिकांची विविध प्रकारची अशी दीड हजार पुस्तके वाचनालयात आहेत. दररोज सकाळी बॅरॅकमध्ये महिलांना अर्धा तास पुस्तके वाचण्यास दिली जातात. पुस्तके वाचून झाल्यावर ती पुन्हा वाचनालयात ठेवली जातात.

शनिवारी गळाभेट
तुरुंगात असलेल्या कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी भेट व्हावी याकरता ‘गळाभेट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. येत्या शनिवारी तुरुंगात गळाभेट हा कार्यक्रम होणार आहे. गळाभेटीदरम्यान महिला व पुरुष कैदी हे पहिल्यांदाच समोरासमोर मुलांना भेटणार आहेत.

महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आहे. त्यांना ज्ञान मिळू लागले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा झाली आहे.
n अरुणा मुरगूटराव, अधीक्षक, भायखळा कारागृह