महामानवाला ऑनलाईन अभिवादन, यंदा चैत्यभूमीवरून होणार थेट प्रक्षेपण!

कोरोनाच्या प्रभावामुळे यावर्षी भीम अनुयायांना महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाइन अभिवादन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी कोणतेही कार्यक्रम होणार नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अनुयायांसाठी यावर्षी पालिकेकडून नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात येणार नाहीत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यविधी मुंबईत दादर चौपाटी परिसरात झाले. ही जागा चैत्यभूमी स्मारक म्हणून साऱयांसाठी वंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे प्रतिवर्षी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात.

त्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी व परिसरात वेगवेगळ्या सुविधांची कामे हाती घेतली जातात. प्रामुख्याने चैत्यभूमी येथे सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा त्यात समावेश असतो. ही सर्व नियमित कामे सध्या सुरू आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)  संजीव जयस्वाल यांनी या कामांची पाहणी करुन आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देशही दिले.

चैत्यभूमी येथील पूर्वतयारीची पाहणी केल्यानंतर जयस्वाल यांनी लगतच्या इंदू मिल येथेही भेट दिली. इंदू मिल जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक साकारत आहे. महापरिनिर्वाण दिनी येणारे अनुयायी इंदू मिल येथेही येतात. त्यामुळे तेथे दरवर्षी नेमकी कशी व्यवस्था केली जाते, त्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. या पाहणीप्रसंगी उपआयुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर, सहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

 गर्दी, एकत्र येण्यावर निर्बंध

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना प्रदान करुन हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तथापि, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही. दरम्यान, राज्याच्या गृह खात्याकडूनही याबाबत लवकरच आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या