
आजकाल फेमस होण्यासाठी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. याचाच प्रत्यय उत्तर प्रदेशातील एका घटनेवरून आला आहे. फेमस होण्यासाठी विधी शाखेच्या एका विद्यार्थ्याने चक्क उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच धमकी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन गुरुवारी या तरुणाने योगींना धमकी दिली आहे. पोस्ट व्हायरल होताच प्रयागराज पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अनिरुद्ध पांडे असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
काय म्हटलंय पोस्टमध्ये?
‘मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाच दिवसांत बॉम्बने उडवून देईन,’ असे आपल्या पोस्टमध्ये आरोपीने लिहिले होते. इतकंच नाही तर आरोपीने पोस्टसह यूपी पोलीस, डीएम आणि यूपी एसटीएफला टॅग केले. अनिरुद्ध पांडेची पोस्ट व्हायरल होताच प्रयागराज पोलिसांचे सायबर सेल सक्रिय झाले. आरोपीला पकण्यासाठी एसओजीची संयुक्त पथके तैनात करण्यात आली होती.
अनिरुद्ध पांडे हा विधी शाखेचा विद्यार्थी असून सराई इनायत येथील माळवा बुजुर्ग गावचा रहिवासी आहे. तो झुंसी परिसरातील एका खासगी महाविद्यालयात विधी शाखेच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याला इनायत परिसरातून ताब्यात घेतले. आपण केवळ फेमस होण्यासाठी हे कृत्य केल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले.