लोनच्या नावाने झोल, डोंगरी पोलिसांनी केले त्रिकुटाला गजाआड

शून्य टक्के व्याजदरावर बजाज फायनान्सकडून लोन मंजूर झाल्याची बतावणी करीत सोहेल कश्मिरी याला दोन लाखांचा चुना लावणारी झोलर टोळी डोंगरी पोलिसांनी गजाआड केली आहे. आरोपींनी दिल्लीत बोगस कॉल सेंटर थाटून हा गुन्हा केला होता. पोलिसांनी तेथे जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

सोहेल अहमद मो. सुलेमान कश्मिरी (48) यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून तीन अज्ञात महिला व एक पुरुषाचे फोन आले आणि तुम्हाला शून्य टक्के व्याजदरावर बजाज फायनान्सचे लोन मंजूर झाल्याचे सांगितले. कश्मिरी याने लोन घेण्यास होकार दाखवताच कॉल करणाऱ्यांनी प्रोसेसिंग फी, जीएसटी चार्जेस, लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असे भरण्यास सांगून दोन लाख तीन हजार रुपये उकळले. पैसे भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कळताच कश्मिरी याने डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर एसीपी धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय डॉ. लिंगे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी कश्मिरी याने ज्या बँक खात्यांमध्ये पैसे भरले होते त्या खात्यांची माहिती काढून अरुण उपाध्याय यास ताब्यात घेतले. उपाध्याय याने चौकशीत गुह्याचा मुख्य सूत्रधार गुलशन वर्मा (31) याचे नाव सांगितल्यानंतर त्याला दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपींचे सर्व आर्थिक व्यवहार पाहणारा अमित सिंग मुंडका याला अटक करण्यात आली.

अनेकांची आर्थिक फसवणूक
आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांनी गुह्यात वापरलेल्या बँक खात्यांचा अभ्यास केला. तेव्हा आरोपींनी दिल्लीत बोगस कॉल सेंटर थाटून विविध शहरांतील नागरिकांची अशा प्रकारे आर्थिक लुटमार केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी डोंगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या