गेल्या सहा-सात वर्षांपासून एका खासगी कंपनीकडून तुळशी धरणात ‘गिफ्ट तिलापिया’ माशांचे पालन केले जात आहे. यामध्ये कमी वेळेत जास्त वाढ होणाऱ्या संकरित जातींच्या माशांचे उत्पादन घेतले जात आहे. तिलापियाची वाढ मंद गतीने होते. मात्र, याच्या संकरित जाती अतिजलदपणे वाढतात. तसेच विविध अधिवासात त्या सहजपणे तग धरू शकतात. या माशांमध्ये संकरीकरणाची उच्च क्षमता आहे. यामुळे मत्स्यशेतीमध्ये याच्या अधिकाधिक संकरित जातींचा उपयोग केला जातो.
तीन वर्षांपूर्वी या मत्स्यपालन केंद्राची जाळी फाटून सुमारे 40 हजार संकरित मासे तुळशी धरणाच्या पाण्यात पसरले होते. दरवर्षी अनेक टन कृत्रिम खाद्य संकरित माशांना खाण्यासाठी धरणातील पाण्यात टाकण्यात येत आहे. जाळे फाटून बाहेर पडलेल्या संकरित माशांनी धरणातील शेवाळ न खाता येथील माशांच्या स्थानिक प्रजाती खाऊन संपविल्या आहेत. मत्स्यपालन करण्यापूर्वी येथे रहू, मिरगल, खडस, खऊल, आंबट, झिंगा व मळव्या आदी स्थानिक जातींचे मासे मुबलक प्रमाणात सापडत होते; पण संकरित माशांनी स्थानिक मासे खाल्ल्यामुळे या स्थानिक प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत.
तिलापिया मासा 1952मध्ये हिंदुस्थानात आणला गेला व विविध मत्स्य केंद्रांमध्ये त्याची पैदास करण्यात आली. सुरुवातीला मत्स्य केंद्रांमध्ये वाढविला जाणारा हा मासा नंतर नद्या, धरणे, तलाव यांमध्ये सोडण्यात आला. हिंदुस्थानात महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला. मात्र, वेगाने प्रजनन होत असल्याने त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. याचा परिणाम म्हणून माशांच्या स्थानिक प्रजाती नष्ट होऊ लागल्या. 1959मध्ये भारतीय मत्स्य संशोधन समितीने मोझाम्बिक तिलापिया माशाच्या प्रसारावर बंदी घातली होती. दरम्यान, स्थानिक माशांच्या प्रजाती संपत आल्यामुळे पाटबंधारे विभाग व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने या तलावात स्थानिक प्रजातीचे लाखो मासे सोडावेत, अशी मागणी होत आहे.
मासेमारीवर विपरीत परिणाम
तिलापिया मासा पाण्याच्या तळाशी माती उकरून घरटे बनवीत असल्याने ज्या पाण्यात याचे प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणचे पाणी गढूळ दिसते. नद्यांच्या वाढत्या प्रदूषणामुळे स्थानिक माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तसेच तिलापिया माशांच्या वाढत्या संख्येमुळे सद्यःस्थितीत माशांच्या स्थानिक प्रजाती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याचा मासेमारीवरदेखील विपरीत परिणाम होत आहे. तसेच स्थानिक पाण्याच्या स्रोतांमधील तिलापियांची अमर्याद वाढ ही गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संस्थेने तिलापिया ही जाती स्थानिक माशांच्या प्रजातींना धोकादायक असणारी अत्यंत आक्रमक जाती म्हणून घोषित केली आहे.
पाटबंधारे व मत्स्यव्यवसाय विभागाने लक्ष द्यावे
राधानगरी आणि करवीर तालुक्यांतील सुमारे 50हून अधिक गावांची जीवनदायिनी असलेला तुळशी प्रकल्प 2026ला 50व्या वर्षात पदार्पण करणार असून, अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या तलावात स्थानिक माशांच्या प्रजाती भरपूर प्रमाणात होत्या. दोन-तीन वर्षांत या प्रजाती गायब झाल्या आहेत. तुळशी तलावाच्या पाण्यावर हिरवट तवंग येऊन पाणी प्रदूषित होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत शेवाळही खूप वाढले आहे. याचा नेमका शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे असे सामाजिक कार्यकर्ते एम. डी. फडके म्हणाले.