
मध्य रेल्वेने रविवारी घेतलेल्या मेगाब्लॉकचा इतर प्रवाशांसह विधी शाखेतील ‘एआयबी’ची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. लोकल ट्रेनचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांना लांबचे परीक्षा पेंद्र वेळेत गाठताना प्रचंड धावाधाव करावी लागली. मध्य रेल्वेच्या मेन लाईनसह हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान पाच तासांचा ब्लॉक घेतला होता. तसेच हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान तसेच ट्रान्स हार्बरवर पनवेल ते ठाणेदरम्यान लोकल सेवा बंद ठेवली होती. रविवारी मुंबईत वकिली सनदसाठी घेतली जाणारी ‘एआयबी’ची परीक्षा होती. ही परीक्षा देण्यासाठी कल्याण, कसारा, वसई, विरार, नवी मुंबई, पनवेल आदी भागांतील हजारो विद्यार्थ्यांना मुंबईतील विविध पेंद्रांवर जावे लागले होते. त्यांची मेगाब्लॉकमुळे प्रचंड गैरसोय झाली. राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱया अनेक परीक्षांचे रविवारी आयोजन केले जाते. या दिवशी परीक्षार्थींची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक रद्द का करीत नाही, असा सवाल विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.



























































