लॉकडाऊनमध्ये चिपळूणात वाळूमाफियांचे थैमान, वाळुसह 9 बोटींना महसुलने दिली जलसमाधी

565

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना चिपळूण येथील गोवळकोट खाडीत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांना दणका बसला आहे. या कारवाईत सुमारे दोन- दोन ब्रास वाळू भरलेल्या बेवारस 9 बोटींना जलसमाधी देण्यात आली आहे. ही कारवाई प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या पथकाने केली. यामुळे संगमेश्वर, रत्नागिरीसह जिल्ह्यातील वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

चिपळूण येथील गोवळकोट खाडीत बेकायदा वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यापूर्वी गोवळकोट येथे वाळूचा साठा देखील आढळून आला होता. त्यामुळे बेकायदा वाळू उपसा होत असल्याची प्रशासनाची खात्री झाली होती. अखेर प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी या विषयाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, चिपळूण मंडल अधिकारी यु. आर. गिज्जेवार, आर. पी. मोहिते, जे. पी. क्षीरसागर असे अधिकारी वर्गाने गोवळकोट, कालुस्ते खाडीकिनारी गस्त घालत होते. यावेळी गोवळकोट खाडीत बेकायदा वाळू उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि महसूल विभागाच्या या पथकाने दुसऱ्या बोटीने वाळू उपसा होत असल्याच्या ठिकाणी जाऊन पाठलाग करण्यास सुरुवात केली. तर अधिकारी वर्ग आपल्या बोटींच्या दिशेने येत असल्याचे पाहताच बोटींवरील लोकांनी बोटींसह किनाऱ्याच्या दिशेने पलायन केले आणि बोटी किनाऱ्यालाच उभ्या करून धूम ठोकली.

महसूल विभागाचे अधिकारीदेखील या बोटींच्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. यानंतर या बोटींची पाहणी केली असता 9 बोटींमध्ये प्रत्येकी सुमारे 2 ब्रास वाळू होती. महसूल विभागाच्या पथकाने वाळूसह बोटीना खाडीत थेट जलसमाधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सर्व बोटी खाडीत बुडवण्यात आल्या ही कारवाई तब्बल सुमारे 7 तास सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या