लॉक-डाऊन निसर्ग चक्रीवादळावर मात करून, बाप्पा निघाले फॉरेनला

585

कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू असलेला लॉकडाऊन व त्यानंतर जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटावर मात करून पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती फॉरेनला निघाले आहेत.

समस्त हिंदुस्थानींचे व परदेशात राहणाऱ्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाप्पाच्या उत्सवावरती कोरोनाचे सावट पसरलं होतं. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय तर रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही गणेश मूर्तिकारकारांनी हार न मानता नव्या जोमाने कामाला लागून पेण शहरातील दिपक कला केंद्रांमधून 1500 गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया व मॉरिशस येथे पाठविले आहेत. इंडोनेशिया व मॉरिशसला बाप्पाच्या मुर्त्या विमानाने गेल्या आहेत तर दुबई थायलंडला मात्र समुद्रमार्गाने पाठवण्यात आले आहेत अशी माहिती कला केंद्राचे मालक निलेश दीपक समेळ यांनी दिली.

 दरवर्षी पेण तालुक्यातून लंडन, ऑस्ट्रेलिया, थिवी, अमेरिका, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशससह अनेक देशांना बाप्पाची वारी होते. पेण तालुक्यातून दरवर्षी सुमारे 1लाख गणेश मुर्त्या फॉरेनला जातात. लंडन ऑस्ट्रेलियन थिवी व अमेरिका येथे बाप्पाच्या मुर्त्या कंटेनर मधून समुद्रमार्ग जहाजाने पाठवण्यात येतात व या प्रवासाला 45 ते 50 दिवस लागतात परंतु यावर्षी लॉक डाउन मुळे या देशांना बाप्पाची वारी होऊ शकली नाही यावर्षी सुमारे 25 हजार गणेशमूर्तींची वारी फॉरेनला होणार आहे.

प्रत्येक गणेशभक्तांच्या घरात पोहोचणार गणेश मुर्ती
लॉकडाऊन, निसर्ग चक्रीवादळाचा गणेश मूर्ती यांच्या कामावर जरी परिणाम झाला असला तरी लहान आकाराच्या गणेशमूर्ती बनवण्याकडे कारखानदारांचा कल असून प्रत्येक भाविकाच्या घरांमध्ये पूजेकरिता मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी गणेशमूर्ती कारखानदारांनी चंग बांधला आहे. 6 इंचा पासून 4 फुटापर्यंत पीओपीच्या गणेश मूर्ती बनवण्यात येत आहेत. तसेच  6 इंच ते 2 फुटापर्यंत शााडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्यात येत आहेत. हिंदू संस्कृती व प्रथा अखंडित राखण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही गणेश मूर्ती कारखानदारांनी दिली.

यावर्षीही 30 लाख गणेशमूर्ती  बनवण्याचा निश्चय
पेण तालुक्यात 900 ते 1000 गणेशमुर्तींचे कारखाने आहेत या कारखान्यांमधून सुमारे अडीच लाख कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. पेण तालुक्यातून दरवर्षी या कारखान्यांमधून सुमारे 30 लाख गणेशमूर्ती बनविल्या जातात. हमरापूर, जोहा विभागातून राज्यातील अनेक शहरांमध्ये गणेशमूर्ती बनवण्याकरिता लागणारा कच्चा मालही पुरवण्यात येतो त्यामुळे पेणचे सुबक गणपती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात. परंतु या वर्षी मात्र सुमारे 25 टक्के गणेशमुर्तीचे उत्पादन कमी होणार आहे. व ही 25% ची कमतरता भरून काढण्याकरिता कारखानदार जोमाने कामाला लागले आहेत.

मुंबई-ठाण्यात स्टॉल उपलब्ध होतील ?
मुंबई पुणे ठाणे कल्याण डोंबिवली येथे गणेशमूर्ती विक्रीकरिता दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारून श्रींच्या मूर्तीची विक्री केली जाते परंतु या वर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शहरांमध्ये सदरचे  स्टॉल उभारण्यात येतील की नाही की नाही याबद्दल मात्र शंका उपस्थित केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या