लॉकडाऊनमध्ये जुळी जन्माला आली; एकाच नाव ठेवलं कोरोना, दुसऱ्याचं कोविड

804
फोटो प्रातिनिधिक

सध्या जगभरात कोरोनाने भयंकर थैमान घातलं आहे. पन्नास हजारांहून अधिक जणांच्या मृत्युला कोरोना व्हायरस कारणीभूत ठरला आहे. देशातही या संकटाला परतवून लावण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या सगळ्यात मात्र नव्याने आई-वडील झालेले काही जण भलतेच उत्साहात आहेत.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानसार, छत्तीसगड येथे एका जोडप्याने आपल्या जुळ्या मुलांची नावं कोरोना आणि कोविड असं ठेवल्याचं वृत्त आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे डॉ. भीमराव आंबेडकर रुग्णालयात 26 आणि 27 मार्च दरम्यानच्या रात्री प्रीती वर्मा नावाच्या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. रुग्णालय गाठतानाही या जोडप्याला अतिशय त्रासातून जावं लागलं. लॉकडाऊन परिस्थितीमुळे कोणतंही वाहन त्यांना मिळालं नाही. आधीच पदरात मुलगी असलेलं हे जोडपं कठीण परिस्थितीत रुग्णालयात पोहोचलं होतं.

त्यानंतर प्रीती हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. त्यानंतर या जुळ्या मुलांपैकी मुलाचं नाव कोविड तर मुलीचं नाव कोरोना ठेवण्यात आलं. विशेष म्हणजे, मुलांना ही नावं ठेवण्याआधी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीही या बाळांना त्याच नावाने हाक मारायला सुरुवात केली होती. त्यामुळे हीच नावं पुढे चालवण्याचा निर्णय या जोडप्याने घेतला. अशी नावं ठेवण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधी उत्तर प्रदेशमध्येही काहींनी आपल्या मुलांची नावं कोरोना आणि लॉकडाऊन अशी ठेवली होती.

आपली प्रतिक्रिया द्या