स्त्री शक्ती… लाॅकडाउनमध्ये संगमेश्वर तालुक्यात महिला अधिकार्‍यांचे अचुक नियोजन

2582

जगात कोरोना विषाणुने हाहाःकार माजवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन लागू केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिश्रा यांनी अचुक नियोजन केले. संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार महिला अधिकार्‍यांनी विशेष नियोजन करुन लाॅकडाउनमधुनही चांगला मार्ग काढुन लोकांचे आरोग्य सांभाळुन हा तालुका जपला आहे.

संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी शॅरेन सोनावणे यांनी यासाठी अचुक नियोजन केले व आरोग्य यंत्रणा उत्तम पद्धतीने हाताळली. नागरीकांच्या आरोग्याला धोका होवु नये व संशयित कोरोना रुग्ण यांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात सोनावणे यशस्वी झाल्याआहेत. त्यांना तालुक्यातील आरोग्यरक्षकांनी चांगले सहकार्य केले व आरोग्यविभाग चांगले काम करु शकला.

दुसर्‍या महिला अधिकारी देवरुख पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी लाॅकडाउन काळात अचुक निर्णय घेत सुरक्षाव्यवस्था पुरवली.आपल्या सहकार्‍यांसह या काळात विशेष बैठकांचे नियोजन करुन नागरीकांना प्रथम या कोरोनाबाबत भीती वाटण्यापासुन परावृत्त केले. आपणच काळजी घेतली, घराबाहेर पडलो नाही तर संक्रमण रोखता येते हे निशा जाधव यांनी पटवुन दिले.अत्यावश्यक सेवा पुरवताना व्यापारी,मेडीकल व्यावसायिक,नागरीक यांच्या बैठका घेवून नियोजन केले. महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून बाहेर गावाहून येणार्‍या नागरीकांना बाहेरच रोखण्यात यशस्वी झाल्याने संगमेश्वर तालुका सुरक्षित राहीला. लाॅकडाउन यशस्वी होताना पोलीसांचे महत्वपुर्ण योगदान लाभले.

तिसर्‍या महिला अधिकारी देवरुख नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांनी देवरुख शहरासाठी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष योगदान दिले.संपुर्ण शहर निर्जंतुणुकीकरण करुन घेतले. प्रभागनिहाय बैठका घेवून लाॅकडाउन काळात नागरीकांनी घराबाहेर न पडता त्यांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अचुक नियोजन केले.आडवडा बाजार बंद ठेवून होणारी गर्दी टाळली.शहर स्वच्छतेवर विशेष भर दिला. मुख्याधिकारी,सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने या काळात नगरपंचायत प्रशासन गतिमान केले.

चौथ्या महिला अधिकारी देवरुख एस.टी.आगार प्रमुख मृदुला जाधव यांनी 22 तारखेचा पहिला जनता कर्फ्यु यशस्वी होण्यासाठी 21 तारखेच्या रात्रीपासुनच बसफेर्‍या रद्द केल्या. 693 बसफेर्‍या रद्द झाल्याने तालुक्यात प्रवासी नागरीक न फिरकल्यामुळे हा कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी झाला.त्यानंतर आधी लांब पल्ल्याच्या व नंतर ग्रामिण भागातील बसफेर्‍या रद्द केल्याने नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यात त्या यशस्वी झाल्या व मानवी साखळी न झाल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळाले.

जिल्हाधिकारी मिश्रा व तहसीलदार सुहास थोरात यांच्या नियोजनात या महिला अधिकार्‍यांनी आपआपल्या क्षेत्रात शंभर टक्के योगदान दिल्याने संगमेश्वर तालुक्याने कोरोनावर मात केली आहे.स्त्री शक्तीचे हे आगळे वेगळे उदाहरण व शिस्त या काळात तालुक्याने अनुभवली. महसुल विभाग व पंचायत समिती प्रशासनाने या सर्व विभागांना चांगले सहकार्य केले.

आपली प्रतिक्रिया द्या