लॉकडाऊनमुळे सांगली बाजार समितीतील सौदे चार महिन्यांपासून बंद, कोल्ड स्टोअरेजमध्ये 90 हजार टन बेदाणा पडून

लॉकडाऊनमुळे तीन-चार महिन्यांपासून बेदाण्याचे सौदे बंद आहेत. याचा परिणाम होऊन कोल्ड स्टोअरेजमध्ये विक्रीविना 80 ते 90 हजार टन बेदाणा पडून आहे. ऐन सणाच्या तोंडावर बेदाणा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे सौदे बंद झाल्याचा आरोप शेतकऱयांतून होत असून, तातडीने सौदे काढण्याची मागणी केली आहे.

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी केल्याने बाजार समितीने गर्दी टाळण्यासाठी बेदाण्यासह हळद, गूळ आदी शेतीमालाचे लिलाव सौदे बंद ठेवले होते. एप्रिलमध्ये दोन आठवडे सौदे सुरू केले होते. मात्र, जिह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन केल्यामुळे समितीने पुन्हा सौदे बंद ठेवले. चार महिन्यांनी सोमवारी हळदीचे सौदे सुरू केले. मात्र, बेदाणा, गूळ सौद्यांबाबत अद्यापि निर्णय झालेला नाही. येथील द्राक्ष आणि बेदाणा देशाबाहेरही विक्रीला जातो.

बेदाणा उत्पादकांचे दुहेरी नुकसान

मिरज, तासगाव, जत, कवठेमहांकाळ,खानापूर भागांतील शेतकऱयांचे अर्थकारण बेदाण्यावर चालते. दिवाळीसाठी बेदाण्याचा मोठय़ा प्रमाणात उठाव होतो. शिवाय मागणी वाढल्याने दरही चढे राहतात. सध्या मात्र सौदे बंद व दरही स्थिर आहेत. परतीच्या पावसाने केलेले नुकसान, पाठोपाठ पडून असलेला बेदाणा असे दुहेरी नुकसान उत्पादकांना सोसावे लागत आहे.

1350 कोटी रुपये अडकले

गत हंगामामध्ये शेतकऱयांनी बेदाणा केला. मात्र, कोरोना, लॉकडाऊनमुळे विक्रीच होऊ शकली नाही. चार महिने सौदे बंद राहिल्याने तब्बल 80 ते 90 हजार टन बेदाणा कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून आहे. सरासरी 150 रुपये किलोने विक्री झाल्यास याची सुमारे 1350 कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम होते. सौदे बंद असल्याने शेतकऱयांची आर्थिक कोंडी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या