लॉकडाऊनमध्ये उपनगरवासीयांनी दररोज 300 मेगावॅट जादा वीज खाल्ली!

310
electricity

लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने घरात बसून असलेल्या उपनगरवासीयांनी हिवाळय़ाच्या तुलनेत दररोज 300 मेगावॅट जादा वीज खाल्ल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीच्या घरगुती ग्राहकांचा दैनंदिन वीज वापर 550-600 मेगावॅट होता. मात्र लॉकडाऊन आणि उन्हाळा एकाचवेळी सुरू झाल्याने घरगुती ग्राहकांच्या दैनंदिन मागणीत 300 मेगावॅटची वाढ होत 900 मेगावॅटवर पोहचल्याचे अदानी इलेक्ट्रिसिटीने स्पष्ट केले.

ग्राहकांना जूनमध्ये आलेली वीज बिले अवाच्या सवा असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.चे सीईओ वन्द्रप पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. फेब्रुवारीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीकडून दररोज सुमारे एक हजार-अकराशे मेगावॅट विजेचे वितरण केले जात होते. त्यापैकी 55 टक्के वीज घरगुती ग्राहकांकडून तर उर्वरित 45 टक्के वीज औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकाकडून वापरली जात होती. मात्र लॉकडाऊन सुरू होताच औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज वापरात घट झाली, मात्र लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरी बसून असल्याने घरगुती ग्राहकांच्या वीज वापरात मोठी वाढ झाली. मीटर रिडींग न घेता मागील वीज वापराच्या आधारे बिलिंग केल्याने मागील तीन महिने कमी बिले आली, तर जूनमध्ये प्रत्यक्ष रिंडिंग झाल्याने बिले वाढल्याचे पटेल यांनी सांगितले.

9 टक्के व्याजाचा भुर्दंड
वीज आयोगाच्या निर्देशानुसार अदानी इलेक्ट्रिसिटीने ग्राहकांना जून महिन्याचे बिल तीन समान हप्त्याने भरण्यास परवानगी दिली आहे. मात्र लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना वीज आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे 9 टक्के दराने व्याज मोजावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या