लॉकडाऊनमुळे महानंदच्या टेट्रापॅकिंग दुधाची चव वाढली, दैनंदिन विक्री दुप्पट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्राला फटका बसला असला तरी महानंद डेअरीला मात्र काहीसा लाभ झाला. कोणत्याही हवामानात सहा महिन्यांपर्यंत टिकणाऱया टेट्रापॅकिंग दुधाची आतापर्यंत मुंबईत दररोज अडीच हजार लिटर विक्री होत होती. पण आता लॉकडाऊन असल्याने दररोज घरातून बाहेर पडावे लागू नये म्हणून ग्राहक एकाच वेळी दहा-बारा लिटर दुध खरेदी करून घरात ठेवत आहेत. त्यामुळे दुधाची विक्री दुप्पटीने वाढली आहे.

मुंबईत लॉकडाऊनच्या आधी दररोज महानंद डेअरीच्या पाऊच पॅकिंग दुधाची पावणे दोन लाख लिटर विक्री होते, तर टेट्रा पॅकिंग दुधाची अडीच हजार लिटर विक्री केली जात होती. मात्र लॉकडाऊननंतर डेअरीच्या पाऊच पॅकिंग दुधाच्या विक्रीत पंधरा टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तर टेट्रा पॅकिंग दूध सहा महिने टिकून रहात असल्याने ग्राहक एकाच वेळी दहा-बारा लिटर दुधाचा बॉक्स खरेदी करत आहेत. तर अनेक ग्राहक डेअरीच्या बाहेर गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या विक्री सेंटरवरून टेट्रा पॅकिंगचे दूध खरेदी करत आहेत.

पन्नास हजार लिटरचे दैनंदिन पॅकिंग

महानंदच्या असेप्टिक प्लांटची दैनंदिन एक लाख लिटर एवढे दूध टेट्रा पॅकिंग करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत लष्कर, नौदल आणि डेअरीला आवश्यक असलेले अडीच हजार लिटर असे एकूण 35-40 हजार लिटर दुधाचे दररोज पॅकिंग केले जात होते. पण आता महानंदचे मुंबईतील वितरण दुप्पटीने वाढल्याने आणि इतर खासगी डेअरी आपले दूध महानंदकडून टेट्रा पॅकमध्ये पॅकिंग करून घेत असल्याने दैनंदिन 50 हजार लिटरचे पॅकिंग केले जात आहे.