मुंबईत आजपासून घरपोच दारू मिळणार! प्रतिबंधित क्षेत्रात मात्र बंदी कायम

पालिकेने चौथ्या लॉकडाऊनसाठी शुक्रवारी सुधारित नियमावली जाहीर केली असून आता मुंबईत घरपोच दारू मिळणार आहे. दारूची फक्त होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देणारे परिपत्रक शुक्रवारी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काढले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र दारू विक्रीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. शिवाय मॉल्स, बाजारपेठ आणि प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने मात्र बंदच राहणार आहेत.

राज्यातील रेड झोन वगळता घरपोच दारू विक्रीला परवानगी यापूर्वीच दिली आहे. मात्र मुंबईत वाढणार्‍या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून ही परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आता प्रतिबंधित क्षेत्र वगळून दारू विक्रेत्यांना घरपोच दारू पुरवता येणार आहे. हा निर्णय घेतल्यानंतर सर्व विभाग अधिकार्‍यांना आपापल्या विभागात नियम पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. याआधी मुंबईत दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर खरेदीसाठी झुंबड उडाल्यानंतर दुसर्‍या दिवशीच तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी परिपत्रक मागे घेत दारू विक्री बंद केली होती. दरम्यान, नियम मोडणार्‍यांवर अत्यावश्यक सेवा प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नो काऊंटर, फक्त ऑनलाईन ऑर्डर

दारू विक्रीला परवानगी देताना फक्त वैध ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून ऑनलाइन वॉर्डर देता येणार आहे. दारूच्या दुकानात पैसे देण्या-घेण्यासाठी कोणतेही काऊंटर सुरू करता येणार नाही. याशिवाय मद्य परवानाधारकाकडूनच ही ऑर्डर स्विकारली जाणार आहे. घरपोच पुरवली जाणारी दारू ही सीलबंद असेल अशीही अट घालण्यात आली आहे. या शिवाय राज्य सरकार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजाणी करणेही बंधनकारक राहणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या