लॉकडाऊनमध्ये कारवाई न करण्यासाठी लाच मागितली, सोलापूरच्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन

1148

सोलापूरमधील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या औद्योगिक पोलीस चौकीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आले असून नागरिकांवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. जमावबंदी, संचारबंदीसारख्या या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जात आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई न करण्यासाठी या पोलीस निरीक्षकाने लाच मागितल्याचं उघड झालं आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

सदर पोलीस अधिकाऱ्याच्या हद्दीमध्ये आसरा चौक, होटगी रोडचा परिसर होता. या अधिकाऱ्याने संचारबंदीच्या काळात गस्त घालायला सुरुवात केली. सर्व दुकान, आस्थापने बंद करण्याचे त्यांनी नियमानुसार आदेश दिले होते. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही केली होती. मात्र आसरा चौकातील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी पैसे मागितल्याची तक्रार सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे आली होती. या प्रकरणी चौकशी करून या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. हा प्रकार गंभीर असल्याने सोलापूर पोलीस दलात सध्या या निलंबनाचीच चर्चा सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या