आगामी वर्षात 50 टक्के फी कपात करा, स्टुडंट लॉ कौन्सिलची मागणी

656

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यातील अनेक क्षेत्राला फटका बसला आहे. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे तर अनेकांची पगार कपात करण्यात आल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक संस्थामध्ये 50 टक्के फी सवलत देण्याची मागणी स्टुडंट लॉ कौन्सिल या संघटनेने केली आहे. यासाठी संघटनेकडून ऑनलाईन याचिका सुरु करण्यात आली असून ही याचिका सध्या पालक वर्गांचे लक्ष वेधून घेत आहेत.

जगभरात सध्या कोरोनाने थैमान माजविले आहे. हिंदुस्थानात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. 23 मार्चपासून सुरु झालेला हा लॉकडाऊन आता चौथ्या टप्प्यात पोहचला आहे. या लॉकडाऊनमुळे मुंबईसह राज्यातील कार्यरत असलेल्या अनेक क्षेत्राला फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेकांच्या पगार कपात करण्यात आली आहे.  त्यामुळे अनेकांना आपल्या मुलांची फी भरणे शक्य होणार नाही. यासाठी राज्य सरकारने फी वाढ करु नये, अशी सूचना दिली असली तरी पालक वर्गांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात 50 टक्के फी कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पवार यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबद्दल अ‍ॅड. सचिन पवार म्हणाले की, लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह राज्याला मोठा फटका बसला आहे. परिणामी पालक वर्गांत देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज अनेकांना शिक्षणापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी 50 टक्के फी कपात करण्याची मागणी आम्ही केली आहे. यासाठी राज्य सरकारला निवेदन दिले असले तरी आम्ही यासाठी ऑनलाइन याचिका सुरु केली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या