दिल्ली तो सिर्फ ट्रेलर है..! ‘INDIA’च्या यशानंतर अंबादास दानवेंचा भाजपला इशारा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये पाशवी बहुमत मिळवत सत्तेत आलेल्या आणि यंदा ‘400 पार’ नारा दिलेल्या भाजपला 300 चा आकडा गाठतानाही नाकीनऊ आले आहेत. भाजप 230, तर एनडीए 290 च्या जवळपास अडखळली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा फटका बसला आहे. दोन पक्ष फोडूनही भाजपला महाराष्ट्रात 22 ते 25 जागाच मिळताना दिसत आहेत, तर महाविकास आघाडी 30 जागांवर पोहोचत आहे. हा कल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले असून भाजपवरही हल्लाबोल केला आहे.

दिल्लीच्या दिशेने धावणारा स्वयंघोषित चाणक्यांचा विजयाचा रथ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्रात रोखण्याचा पराक्रम केला आहे. हा रथ नुसताच रोखला नाही तर या रथाचे चाकही मोडले आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतरही मस्तवाल शक्तींना योग्य संदेश आणि याविरुद्ध लढा देणाऱ्यांना दिशा देण्याचे काम महाराष्ट्राच्या मातीने, येथील लोकांनी कायम केले आहे. हाच कित्ता गिरवून आज महाराष्ट्राने दिल्लीला संदेश दिला आहे, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, हे स्वयंघोषित चाणक्य महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट आलेलं असताना कधीच येथील लोकांना धीर देत नाहीत, मदत तर लांबची बात आहे. मात्र निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता आपल्याला साथ देईल, असे म्हणून गृहीत धरतात. आज त्याला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार चपराक देत हे मतदान केले आहे महागाईच्या विरोधात.. बेईमानीच्या विरोधात.. महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेशला उद्योग पळवण्याच्या विरोधात.. खतांच्या किंमती वाढवून खात्यात किसान सन्मान निधीच्या नावाने टाकल्या जाणाऱ्या भिकेच्या विरोधात.. पक्षफोडीचे बीज पेरणाऱ्यांच्या विरोधात.. जुमलेबाजीच्या विरोधात.. आंदोलनाला बसलेल्या महिला खेळाडूंकडे केलेल्या दुर्लक्षच्या विरोधात.. मणिपूरच्या महिलांवर झालेल्या बेसुमार अत्याचाराच्या विरोधात..

महाराष्ट्रातील मतदारांपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेला संदेश महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सामान्य मतदारांपर्यंत योग्यपणे पोहचवला. परिणामाची, उन्हाची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी निकराने दिलेल्या लढ्याचे हे फळ आहे. यासाठी या कार्यकर्त्यांचे कौतुक आहे, असेही ते म्हणाले.

आता थांबायचे नाही! निम्मी लढाई आपण लोकसभेच्या निमित्ताने जिंकली आहे. निम्मे यश विधानसभेत मिळवून अहंकाराच्या टोकावर बसलेल्या लोकांना धडा शिकवायचा आहे. दिल्ली तो सिर्फ ट्रेलर है.. विधानसभा का पिक्चर अभि बाकी आहे.. लढेंगे भी.. जितेंगे भी !! जय हिंद, जय महाराष्ट्र, असेही अंबादास दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे.