आज निवडणूक सुधारणांवर 10 तास चर्चा; मतदारयाद्यांचा घोळ, एसआयआरवरून सरकारला घेरणार

निवडणूक सुधारणांवर उद्या लोकसभेत 10 तासांची चर्चा होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल, मतदारयाद्यांमधील घोळ, विविध राज्यांमध्ये ‘एसआयआर’मध्ये तैनात असलेल्या 30 पेक्षा जास्त बीएलओंचा मृत्यू यामुळे विरोधकांनी ‘एसआयआर’ विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून लोकसभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने बिहार निवडणुकीनंतर 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एसआयआर’ मोहीम राबविली आहे. त्याचा सर्व विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. ‘एसआयआर’वर संसदेत चर्चेची मागणी विरोधकांनी अतिशय आक्रमकपणे उचलून धरली होती. पहिल्या आठवडय़ात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प पाडले होते. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात ‘मतचोरी’च्या घोषणांनी संसद दणाणून सोडली होती. त्यामुळे मोदी सरकार झुकले आणि चर्चेस तयार झाले. मंगळवारी ‘निवडणूक सुधारणा’ यावर चर्चा होणार असून बुधवारी कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल हे चर्चेला उत्तर देतील.

  • मतचोरी तसेच निवडणूक आयोगाची जबाबदारी, बीएलओंवरील कामाचा तणाव यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. सर्व विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आणून निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली होती. हा विषय विरोधक चर्चेत आक्रमकपणे मांडतील.