तलवारी खणखणल्या… दांडपट्टे फिरले… वाजले टाळ-मृदंगही, लोकाधिकार महासंघाचे दिमाखदार शिवराय संचलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोर्ट नगरी आज गगनभेदी शिवघोषाने दुमदुमली. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा जयघोषाने अवघा परिसर दणाणून गेला. भगवे फेटे, भगव्या टोप्या घातलेले शिवभक्त ढोल-ताशांच्या गजरात डौलाने भगवा फडकवत होते. वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन नाचत होते. शिवकालीन मर्दानी खेळ, भगव्या साडय़ा परिधान केलेल्या महिलांचे लेझीम, पुणेरी ढोल असा मराठमोळा माहोल फोर्ट परिसरात अवतरला होता. निमित्त होते स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या शिवराय संचलनाचे. चार दशकांपूर्वी सुरू झालेल्या या शिवराय संचलनात आजही तोच जोष, तोच उत्साह, तोच जल्लोष दिसत होता.

लोकाधिकार महासंघाच्या शिवराय संचलनाचा शुभारंभ अमर बिल्डिंग, रिझर्व्ह बँक येथून झाला. महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई आणि शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांनी एका ट्रकवर फुलांच्या सजावटीत विराजमान झालेल्या शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठाrत प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, रमेश कोरगावकर आदी उपस्थित होते. ट्रकच्या पुढे मावळय़ांनी शिवपालखीही घेतली होती. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती यावेळी लाभली. विविध आस्थापनांतील महासंघाशी संलग्न समित्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासैनिक, भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते, महिला आघाडीचे कार्यकर्ते यांच्यासह शिवसेनेचे नेते, उपनेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदी हजारो लोक या संचलनात सहभागी झाले होते. यंदा सीमाभागातील मराठी बांधवांसह बेळगावचे संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी हेसुद्धा आवर्जून संचलनात उपस्थित होते.

शिवराय संचलन पाहण्यासाठी फोर्टमधील रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. भगवे झेंडे, पताका आणि बॅनर्सनी संचलनाचा मार्ग भगवामय झाला होता. त्यासाठी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. दांडपट्टा, ढाल-तलवारी, लाठय़ाकाठय़ा, बाराबनाटी, चौरंगचक्र आदी शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही या संचलनाचे आकर्षण ठरले. संचलनादरम्यान हुतात्मा स्मारक आणि श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. हिंदुस्थानचे महाद्वार गेटवे ऑफ इंडिया येथे शिवरायांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून संचलनाची सांगता झाली.

…ही भगवी परंपरा अखंड राहील

विविध सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये मराठी माणसांचा टक्का वाढावा या उद्देशाने लोकाधिकार चळवळीचा जन्म झाला. फोर्ट परिसरात अशी असंख्य आस्थापने आहेत. तिथे मराठी माणसाचा आवाज सदैव बुलंद राहण्यासाठी शिवराय संचलनाची ही भगवी परंपरा अखंड सुरू राहील, असा निर्धार संचलनाच्या सांगताप्रसंगी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.