कमी वजनाच्या तसेच जन्मतः जीविताला धोका असणाऱ्या नवजात बालकांचा जीव वाचवण्यासाठी पालिकेची मातृ दुग्ध बँक लाखमोलाची कामगिरी करत आहे. पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रयत्नांमुळे मागील पाच वर्षांत 10 हजार 523 नवजात बालकांना दुग्धदानामुळे जीवदान मिळाले आहे. 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत 43 हजार 412 मातांनी स्वेच्छेने दुग्धदानाचे मोलाचे कर्तव्य समाजासाठी बजावले आहे. लोकमानय टिळक रुग्णालयाचा हा उपक्रम मुंबईसह राज्यभरात आणि परराज्यातही कौतुकाचा विषय ठरला आहे.
जन्मतः पुरेशी वाढ न झालेल्या तसेच कमी वजनाच्या बालकांना लोकमान्य टिळक रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (निओनॅटल इन्टेसिव्ह केअर युनिट) मातृ दुग्ध बँकेच्या माध्यमातून दुधाचा पुरवठा करण्यात येतो. रुग्णालयात दरवर्षी सरासरी 10 हजार ते 12 हजार इतक्या बालकांचा जन्म होतो. त्यापैकी 1500 ते दोन हजार इतक्या प्रमाणात काही कमतरता असलेल्या नवजात बालकांना या मातृ दुग्ध बँकेच्या माध्यमातून दुधाचा पुरवठा करण्यात येतो. गेल्या पाच वर्षांमध्ये एकूण 51 हजार 214 मातांचे दुग्धदानासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी 43 हजार 412 मातांनी दुग्धदान केले. या दुग्धदानातून सुमारे 4 हजार 184 लिटर दूध जमा झाले.
मातृ दुधाची आवश्यकता
ज्या मुलांचे वजन जन्मतःच कमी असते त्यांना अथवा पुरेशी वाढ न झालेल्या बालकांना या दुधाचा पुरवठा करण्यात येतो तसेच प्रसूतीनंतरच्या गुंतागुंतीमुळे बाळाला दूध न पाजू शकणाऱया तसेच कमी दूध असणाऱया मातांच्या बाळाला हे दूध पाजण्यात येते.
रुग्णालयातील मातृ दुग्ध बँकेमुळे अनेक नवजात बालकांना जन्मानंतर मातृ दूध मिळवून देणे शक्य तर झाले आहेच, त्याही पुढे जाऊन आता या रुग्णालयाची मातृ दुग्ध बँक ही पश्चिम हिंदुस्थानात नव्याने होऊ घातलेल्या मातृ दुग्ध बँकांच्या उभारणीसाठीदेखील सहकार्य करत आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
मातृ दुग्ध बँकेसाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय हे पश्चिम हिंदुस्थानासाठी विभागीय सल्लागार केंद्र (झोनल रेफरन्स सेंटर) म्हणून 2019 पासून कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शासकीय तसेच खासगी रुग्णालयाच्या ठिकाणी मातृ दुग्ध बँक निर्माण करण्यासाठी विविध सल्ला आणि पर्यवेक्षकाच्या स्वरूपातील कार्य पेंद्राच्या माध्यमातून करण्यात येते.
केंद्राशी संलग्न राज्यांमध्ये गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दमण आणि दिव तसेच महाराष्ट्रातील रुग्णालये संलग्न आहेत. या पेंद्राच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि परिचारिकांसाठी प्रशिक्षणाचे नियमितपणे आयोजन केले जाते.