400 पारचा नारा खोटा, मी माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जिंकलो; BJP खासदारानेच पक्ष नेतृत्वाचं बिंग फोडलं

भाजप नेते आणि खासदार राव इंद्रजीत सिंह यांनी मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यांनी आपल्याच पक्षाचा 400 पारचा नारा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. शिवाय माझे कार्यकर्ते नसते तर मी ही निवडणूक हरलो असतो, असेही राव इंद्रजीत सिंह म्हणाले.

गुडगाव लोकसभा मतदारसंघात राव इंद्रजीत सिंह यांनी काँग्रेस नेते राज बब्बर यांचा 80 हजार मतांनी पराभव केला. गुडगाव मतदारसंघामध्ये राव इंद्रजित सिंह यांना 8 लाख 7 हजार मतं मिळाली तर राज बब्बर यांनी 7 लाख 33 हजार मतं मिळाली. मात्र त्यांच्या विजयाचा आकडा मागच्या दोन निवडणुकांपेक्षा फारच कमी झाला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिथे 3 लाख हून अधिक मतांनी विजयी झाले होते. तर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होऊनही ते मोठ्या फरकाने विजयी झाले होते.

2014 लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसहून भाजपमध्ये राव इंद्रजीत सिंह आले होते. त्यांच्यापाठोपाठ अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आले होते. मात्र गुडगाव लोकसभा मतदारसंघ जिंकणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. त्यांच्या विरोधात राज बब्बर उभे होते. मतमोजणीच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत राज बब्बर आघाडीवर होते. मात्र शेवटच्या क्षणाला राव इंद्रजित सिंह यांना आघाडी मिळाली आणि ते विजयी झाले.