दाल में कुछ काला नही, पुरी दाल ही काली है…मिंधे टोळीकडून मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम हॅक, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्या विजयासाठी ईव्हीएम हॅक केल्याचे उघड झाले आहे. मतमोजणी केंद्रात वायकर यांचा मेहुणा जो मोबाईल घेऊन फिरत होता त्या मोबाईलवर ईव्हीएम अनलॉक करण्याचा ओटीपी येत होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विजय ‘मॅनेज’ करण्यासाठी मिंधे टोळी व निवडणूक अधिकाऱ्यांनी रचलेल्या कारस्थानावर टीकेची झोड उठत आहे. ‘दाल में कुछ काला नही पुरी दाल ही काली है’ अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे विजयी झाल्याचे घोषित केले होते, मात्र नंतर मतमोजणी केंद्रात छुपी अंतर्गत सूत्रे हलवली गेली. वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडिलकर भर मतमोजणी केंद्रातच मोबाईलवर बोलताना आढळला. त्याच्याबाबत हिंदू समाज पक्षाचे भरत शाह व जनआधार पार्टीचे सुरिंदर अरोरा मोहन यांनी आधी निवडणूक अधिकारी व नंतर पोलिसांकडे रीतसर तक्रार दिली. त्याआधारे वनराई पोलिसांनी मंगेश पंडिलकर तसेच निवडणूक आयोगाच्या ‘एन्कोर’ पोर्टलचा ऑपरेटर दिनेश गुरव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडिलकर ईव्हीएमशी कनेक्ट असलेला मोबाईल वापरत होता. याच मोबाईलवर ईव्हीएम अनलॉक करण्याचा ओटीपी येत होता, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

मोबाईल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला

वायकर यांच्या मेहुण्याने वापरलेल्या मोबाईलच्या तपासणीतून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी पंडिलकरने वापरलेला मोबाईल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला आहे. मोबाईलचा फोन डाटा (कॉल रेकॉर्डस) तसेच त्यावरील ठशांची तपासणी केली जाणार आहे. अधिक तपासासाठी पोलिसांनी आरोपी मंगेश पंडिलकर आणि दिनेश गुरव या दोघांना फौजदारी दंड संहितेच्या कलम 41 (अ) अन्वये नोटीस पाठवली आहे.

 …तर अटक वॉरंट काढणार

नेस्को मतमोजणी केंद्रात पंडिलकर जो मोबाईल घेऊन फिरत होता तो मोबाईल आणखी कोणकोणत्या कारणांसाठी वापरला गेला, याचा सखोल तपास सुरू आहे. याबाबत इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून पंडिलकर व दिनेश गुरवला पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यांनी तपासात सहकार्य केले नाही तर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमपियारे राजभर यांनी दिली. तसेच नेस्को सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मतमोजणी केंद्रातील कथित कारस्थानात आणखी किती लोकांचा सहभाग आहे? पंडिलकरला नेमका मोबाईल कोणी पुरवला? याचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ईव्हीएमला मोबाईल कनेक्ट होत नाहीः आयोग

ईव्हीएमला मोबाईल कनेक्ट होत नाही असा दावा उत्तर-पश्चिम मुंबईच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी केला. ‘ईव्हीएम’ अनलॉक करण्यासाठी मोबाईलवर ओटीपी येत नाही. कारण त्यात ‘वायरलेस कम्युनिकेशन’ क्षमता नाही. याबाबत चुकीची माहिती माध्यमांनी दिली आहे, असे त्या म्हणाल्या. मतमोजणी वेळचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाच्या परवानगीनंतर दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानात ईव्हीएम ब्लॅक बॉक्स झालाय

हिंदुस्थानात ईव्हीएम मशीन हे एक ब्लॅक बॉक्स असून त्याच्या तपासणीची कुणालाही परवानगी नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हल्ला केला. राहुल गांधी यांनी मस्क यांची पोस्ट रिपोस्ट करत ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल संशय व्यक्त केला. तसेच मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघात कशा पद्धतीने लोकशाहीच्याच डोळय़ात धूळफेक केली गेली, याबद्दलच्या बातमीचे कात्रणही ‘एक्स’वरून शेअर केले आहे. जेव्हा संस्थांमध्येच उत्तरदायित्वाचा अभाव असतो तेव्हा लोकशाहीची घोर फसवणूक होण्याचीच अधिक शक्यता असते, असे नमूद करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर राहुल यांनी चिंता व्यक्त केली.

हे भाजप आणि मिंधे टोळीचेच कारस्थान

एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो. मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे. कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करीत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाने पूर्णपणे तडजोड केली आहे. निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज दिले नाही. ‘चंदिगड’च्या प्रकरणात निवडणूक आयोगाची प्रतिमा मलीन झाली. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाचा खटाटोप दिसतोय. भाजप व मिंधे टोळीला लोकशाही संपवायची आहे, राज्यघटना बदलायची आहे. उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रातील गैरप्रकार हा त्याच कारस्थानाचा भाग आहे, असा आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.