लोणावळा आणि खंडाळय़ाचे आरस्पानी दर्शन, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसला ‘विस्टाडोम’ पारदर्शक छताचा कोच

कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर प्रवाशांअभावी बंद केलेली मुंबई-पुणे डेक्कन एक्प्रेस शनिवार, 26 जूनपासून पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. ही गाडी आता एलएचबी डब्यांसह धावणार असून तिला पारदर्शक छताचा ‘विस्टाडोम’कोच बसविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या 835 रुपयांत लोणावळा-खंडाळ्यातील धबधब्यांचे मनोहारी दर्शन घेता येणार आहे.

ट्रेन क्र. 01007 विशेष डेक्कन एक्प्रेस 26 जूनपासून सीएसएमटीहून रोज स. 7.00 वा. सुटेल आणि स. 11.05 वाजता पुण्याला पोहोचेल. परतीची ट्रेन क्र. 01008 दुपारी 3.15 वा. पुण्याहून सुटेल आणि सीएसएमटी येथे सायं. 7.05 वाजता पोहोचेल. विस्टाडोम कोचमुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांना माथेरान डोंगर (नेरळ), सोनगीर डोंगर (पळसदरी), उल्हास नदी (जांबरूंगजवळ), उल्हास व्हॅली, खंडाळा आणि लोणावळ्याचा हिरवा निसर्ग दक्षिण-पूर्व बोरघाटातील बोगदे आणि पावसाळी धबधबे अशा निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटता येणार आहे. विस्टाडोममध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरत्या आणि पुशबॅक खुर्च्यांचा समावेश आहे. या गाडीचे आरक्षण 24 जूनपासून सुरू होईल. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाडय़ांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांना कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

थांबे ः दादर, ठाणे, कल्याण, नेरळ (केवळ ट्रेन क्र.01007), लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजी नगर.
डब्यांची रचना ः एक विस्टाडोम, 3 वातानुकूलित चेअर कार, 10 द्वितीय आसन श्रेणी, 1 गार्ड ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसन श्रेणी.

जनशताब्दीशी डेक्कन एक्स्प्रेस संलग्न केली!
मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱया दादर-मडगाव जनशताब्दी एक्प्रेसला नुकताच एलएचबी तंत्रज्ञानाचा नवा विस्टाडोम कोच लावला आहे. या ट्रेनला सीएसएमटीहून सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे तिचे मेंटेनन्स येथेच होणार आहे. त्यामुळे हीच ट्रेन क्रमांक बदलून मुंबई ते पुणे डेक्कन एक्प्रेस म्हणून चालविण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या