विराट आधुनिक युगाचा ‘येशू’

4

सामना ऑनलाईन। लंडन

आताच्या क्रिकेटमध्ये बाद झाल्यावरही मैदानातून जायला तयार नसणारे अनेक फलंदाज आहेत. असे फलंदाज मला मुळीच आवडत नाहीत. पण हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीच्या प्रामाणिकपणामुळे मी त्याचा मोठा चाहता झालोय. तो आधुनिक युगातील प्रभू येशूच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही अशी भावना इंग्लंडचा माजी नामवंत फिरकीवीर ग्रॅम स्वान याने बोलून दाखवली आहे.

मैदानावरील पंचांनी तुम्हाला बाद घोषित करेपर्यंत तुम्ही मैदानात उभे राहायला हवे. खेळाडू बाद आहे की नाही हे सांगणे पंचाचे कर्तव्य आहे असे अनेक फलंदाजांचे म्हणणे असते. जर तुमच्या बॅटला लागून चेंडू झेलला गेला आहे, तुम्हालादेखील ती गोष्ट माहीत आहे आणि तरीदेखील तुम्ही मैदानातच उभे आहात. तर ती शुद्ध फसवणूक आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला फसवत आहात असे स्वान म्हणाला.

विराट इतका प्रामाणिक की आऊट नसतानाही बाहेर गेला
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली पंचांनी बाद घोषित करण्याआधीच मैदान सोडून माघारी परतला. त्याला तंबूत परतल्यावर समजले की चेंडू बॅटला लागलाच नव्हता. पण विराट हा इतका प्रामाणिक ठरला की बाद नसतानाही तो मैदानातून बाहेर निघून गेला. त्याने स्वतःलाच बाद ठरवले आणि तो माघारी परतला. त्यामुळे विराट हा आधुनिक काळातील येशू आहे असे स्वानने सांगितले.