श्रीकृष्णाची याचिका न्यायालयाने स्वीकारली, मथुरेतील मशिदीच्या जमिनीसह संपूर्ण भूमीवर सांगितला मालकी हक्क

अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर रामलल्लांची याचिका न्यायालयाने स्वीकारली होती. त्याचप्रमाणे मथुरेतील जन्मभूमी वादावर श्रीकृष्णाची याचिकाही आज जिल्हा न्यायालयाने स्वीकारली. श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरात अतिक्रमण करून शाही इदगाह मशिद बनवण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. शाही मशिदीच्या जमिनीसह 13.37 एकर जमिनीवर श्रीकृष्णाने मालकी हक्क मागितला आहे.

ही याचिकाकर्ते आहेत ‘श्रीकृष्ण विराजमान’. गेल्या 12 ऑक्टोबर रोजी श्रीकृष्ण विराजमान यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात खटला भरला गेला होता. जिल्हा न्यायालयाने यासंदर्भात सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डासह चार पक्षांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यात शाही मस्जिद इदगाह ट्रस्ट, श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आणि श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान यांचा समावेश असल्याची माहिती श्रीकृष्ण विराजमान यांचे वकील हरीशंकर जैन यांनी दिली.

श्रीकृष्ण विराजमान यांच्या वतीने याचिका दाखल करणाऱया रंजना अग्निहोत्री यांनी याबाबत माहिती देली. 25 सप्टेंबर रोजी दिवाणी न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 30 सप्टेंबरला ती फेटाळली गेली. त्यानंतर जिल्हा न्यायालयात अपिल करण्यात आले. तिथे याचिका मंजूर केली गेली.

ही याचिका श्रीकृष्ण विराजमान, स्थान श्रीकृष्ण जन्मभूमी कटरा केशव देव केवट, रंजना अग्निहोत्री, प्रवेश कुमार, राजेश मणि त्रिपाठी, करुणेश कुमार शुक्ल, शिवाजी सिंह, त्रिपुरारी तिवारी यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. शाही मशिद जिथे उभी आहे त्या जागी एक कारागृह होते, ज्यामध्ये कृष्णाचा जन्म झाला होता असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

मथुरा विवाद काय आहे?
1951 मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना केली गेली. मथुरेत श्रीकृष्णाचे भव्य मंदिर बनवायचे आणि त्याचे व्यवस्थापन ट्रस्टने बघायचे असा निर्णय घेतला गेला होता. त्यानंतर 1958 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ या संस्थेची स्थापना केली गेली. कायद्याने या संस्थेला जन्मभूमीच्या जमिनीवर मालकी हक्क मिळाला नव्हता. पण या संस्थेने ट्रस्टसाठी काम सुरू केले.
1964 मध्ये या संस्थेने सर्व जमिनीवर नियंत्रण मिळावे यासाठी दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला परंतु नंतर 1968 मध्ये स्वत:च मुस्लिम पक्षाशी समझोता केला. त्यानुसार मुस्लिम पक्षाने मंदिरासाठी आपल्या ताब्यातील काही जागा सोडली आणि त्यांना त्याबदल्यात जवळची जागा दिली गेली.

आपली प्रतिक्रिया द्या