भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे नगर येथील लॉरिट्झ कन्यूड्सन इलेक्ट्रिकल ऍण्ड ऑटोमेशन, युनिट ऑफ श्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रा.लि. येथील कामगारांना 12 हजार 500 रुपयांची घसघशीत पगारवाढ झाली आहे. पगारवाढीसह कामगारांच्या संपूर्ण कुटुंबाला मेडिक्लेम, 15 ते 35 वर्षांपर्यंत दीर्घ सर्व्हिस अवार्ड अशा सवलतीदेखील मिळाल्या आहेत. त्याबद्दल कर्मचाऱयांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.
गेली कित्येक वर्षे या कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्रप्त युनियन आहे. सदर वेतनवाढीचा करार 26 ऑगस्ट रोजी भारतीय कामगार सेना व लॉरिट्झ कन्यूड्सन इलेक्ट्रिकल ऍण्ड ऑटोमेशनचे व्यवस्थापन यांच्यादरम्यान करण्यात आला. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेल्या सुविधा कामगारांना यापुढेदेखील मिळणार आहेत. या करारावर भारतीय कामगार सेनेच्या वतीने शिवसेना नेते, खासदार, अध्यक्ष अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव यांनी तसेच व्यवस्थापनाच्या वतीने उपाध्यक्ष अरविंद पारगावकर, प्रशासकीय निर्देशक जगदंब जोशी, फॅक्टरी हेड लक्ष्मण पुजारी, निर्देशक महेश चांडक, वरिष्ठ महाप्रबंधक अविनाश मांडे, आशुतोष कोल्हटकर, प्रशासकीय महाप्रबंधक श्रीकांत गाडे, आय.टी. एक्सपर्ट स्वप्नील ओस्तवाल, मानव संसाधन व्यवस्थापक अभिजित देव, प्रशासकीय व्यवस्थापक उदयन बडकस, युनिट कमिटीतर्फे अध्यक्ष मधुकर निकम, सेक्रेटरी कृष्णा गोंडाळ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, खजिनदार अनिल बेरड, धनंजय तांदळे, विठ्ठल कोतकर यांनी स्वाक्षऱया केल्या.
कामगारांना अशा मिळणार सुविधा
कामगारांना महिन्याला सरासरी 12,500 एवढी भरघोस पगार वाढ करण्यात आली असून कमीत कमी सरासरी चार हजार आणि जास्तीत जास्त सरासरी 17,750 पगारवाढ, कामगारांतर्फे 20 टक्के काम वाढीव देण्यात येणार, कामगाराची सर्व्हिस 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्षापासून प्रतिवर्ष एक दिवसाची ग्रॅच्युईटी जास्त मिळणार, कंपनीतर्फे संपूर्ण कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंत मोफत मेडिक्लेम, वर्षातील पेड हॉलिडे आठ वरून आता नऊ दिवस, दीर्घ सर्व्हिस अवॉर्ड 15 वर्षांपासून ते 35 वर्षांपर्यंत अनुक्रमे 10 हजार ते 30 हजार या टप्प्यात देण्यात येणार आहेत. जेणेकरून संपूर्ण नोकरीत एक लाख रुपयांपर्यंत सर्व्हिस अवॉर्ड एका कामगारास मिळेल.