
ओटीपी शेअर करून पैसे गमावल्या प्रकरणी बँकेविरोधात तक्रार दाखल करणाऱया अर्जदाराला मुंबई ग्राहक संरक्षण आयोगाने सुनावले. या प्रकरणी बॅंकेला दोषी धरता येणार नाही, असे स्पष्ट करत आयोगाने अर्जदाराची तक्रार फेटाळून लावली.
अर्जदार जानेवारी 2022मध्ये नेटफ्लिक्सचे संपलेले सबस्क्रिप्शन रिन्यू करत असताना त्याला ई-मेलवर एक लिंक आली. त्यावर त्याने बँकेची माहिती भरली आणि ओटीपी शेअर केला. त्यानंतर त्याच्या अकाऊंटमधून 1 लाख 25 हजार डेबिट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने ग्राहक संरक्षण तक्रार आयोगाकडे दाद मागितली. त्यावर आयोगाचे अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्य गौरी एम कापसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावर त्यांनी स्पष्ट केले की, जर ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असेल तर संपूर्ण नुकसानाला ग्राहकाने स्वतःला जबाबदार ठरवावे, असे आरबीआयने स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालयाने अर्जदाराची मागणी फेटाळून लावत तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला.
बँक म्हणते…
बँकेने असा युक्तिवाद केला की, तक्रारदार गुंतवणूकदारांनी स्वतःच एका फसव्या लिंकवर क्लिक केले होते आणि सर्व तपशील त्याच्या क्रेडेन्शियल्सशी जुळत असल्याने एक ओटीपी जनरेट करण्यात आला. हा ओटीपी त्याने कोणतीही शहानिशा न करता शेअर केला.


























































