जीएसटीमुळे उद्ध्वस्त होणारा लॉटरी व्यवसाय वाचवा!

65

देशातील लॉटरीवर 1 मार्चपासून सरसकट 28 टक्के जीएसटी लागू होणार असल्याने लॉटरी उद्योग उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले लाखो विक्रेते, लॉटरी टर्मिनल चालक-मालक, प्रिंटर, कुरीअरवाले बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉटरी व्यवसाय वाचवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी अभिकर्ता-विक्रेता सेनेने केली आहे.

लॉटरी व्यवसायावर याआधी जेव्हा संकट आले तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे लॉटरी चालकांच्या मागे उभे राहत होते. आतापर्यंत लॉटरीवर बारा टक्के जीएसटी लावला जात होता त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी चालू होती, मात्र आता 28 टक्के जीएसटी होणार असल्याने महाराष्ट्राची लॉटरीही बंद पडणार आहे. त्यामुळे सरकारला मिळणारा करोडो रुपयांचा महसूल बुडणार आहे. तसेच 10 लाखांहून अधिक लोकांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉटरीवरील जीएसटी कमी करून न्याय द्यावा अशी मागणी लॉटरी अभिकर्ता-विक्रेता सेनेने केली आहे. तसेच लॉटरी व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्य ऑनलाइन लॉटरी सुरू करण्यात येणार होती त्याचे काय झाले, असा सवाल केला आहे. तसेच वाढीव जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय बंद पडल्यास बेरोजगार होणाऱयांनी काय करावे याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या