गोपाळकाल्याची लॉटरी नवरात्रीत फुटणार; ९०० भाग्यवंतांचे सिडकोच्या नव्या घरात दसऱ्याला सीमोल्लंघन

सिडकोने नव्याने जाहीर केलेल्या 902 घरांच्या योजनेची सोडत नवरात्रीमध्ये येत्या 10 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे भाग्यवंतांचे नव्या घराचे सीमोल्लंघन दसऱ्याला होणार आहे. कळंबोली, खारघर, घणसोली, खारघर, व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती व वास्तुविहार- सेलिब्रेशन गृहसंकुलांतील सदनिकांचा या योजनेत समावेश असणार आहे.

सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. या वर्षीच्या गोपाळकालाच्या मुहूर्तावर उपलब्ध 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधील उपलब्ध 213 सदनिकांपैकी 38 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आणि 175 सदनिका या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील उपलब्ध 689 सदनिकांपैकी 42 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता, 359  सदनिका अल्प उत्पन्न गटाकरिता, 128 सदनिका मध्यम उत्पन्न गटाकरिता आणि 160 सदनिका या उच्च उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत.

स्वप्न साकार होणार

योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस उद्यापासून प्रारंभ होणार आहे. या गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाणार आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी व्यक्त केली आहे.