‘मार्मिक’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी गेल्या चार वर्षांत साप्ताहिक ‘मार्मिक’च्या मुखपृष्ठासाठी काढलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले होते. ‘नवे फटकारे’ या शीर्षकाखालील या प्रदर्शनातील व्यंगचित्रांची उद्धव ठाकरे यांनीही या वेळी प्रशंसा केली.
कोरोना आटोक्यात आल्यानंतर मास्कबंदी उठवल्यावर ‘फसव्या’ रामदेव बाबांची झालेली ‘पोलखोल’ सर्जेराव यांनी व्यंगचित्रांद्वारे चपखल मांडली होती. केवळ आसूड ओढणारीच नव्हे तर प्रेम आणि आपुलकी दर्शवणारी, धाडशी निर्णयांची प्रशंसा करणारी व्यंगचित्रेही सर्जेराव यांच्या कुंचल्यातून मार्मिकच्या मुखपृष्ठावर साकारली. ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काढलेले ‘गानसरस्वतीचे महानिर्वाण’, जम्मू-कश्मीरमधील 370 कलम हटवण्याचा नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला धाडशी निर्णय, कोरोना महामारीमध्ये मास्क न वापरता इतरांच्या सुरक्षेला धोका बनलेल्या ‘चेकाळलेल्या साहसवीरां’बद्दल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली कठोर भूमिका हे विषयही त्यांनी व्यंगचित्रांतून प्रभावीपणे मांडले आहेत.
370 कलम हटवल्यानंतर मोदींचे कौतुक करणाऱ्या सर्जेराव यांनी मोदींच्या अवास्तव परदेश दौऱ्यांवरच फटकारे ओढले. ‘परिधान मंत्र्यांची फिरकी’ या व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिरकी घेण्यात आली आहे. ‘तुमचो खेळ खयंच्या गावात आसा’ असे एक दशावतारी कलाकार त्यांना विमान प्रवासात विचारतोय असे त्यात दाखवण्यात आले आहे. हे व्यंगचित्र पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवल्याशिवाय राहत नाही.
1960मध्ये ‘मार्मिक’ सुरू झाले तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लहान होते. मार्मिकच्या 60व्या वर्धापनदिनी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. असा हा प्रवास दाखवणारे व्यंगचित्रही लक्षवेधी ठरले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी 15 ऑगस्टपर्यंत खुले आहे.
व्यंगचित्र प्रदर्शन आवर्जून पहा
व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी कौतुक केले. अप्रतिम प्रदर्शन असून ते पाहताना सगळी मुखपृष्ठे एकत्र आल्यानंतर तो सर्व काळ डोळय़ासमोर उभा राहतो, असा अनुभवही त्यांनी सांगितला. प्रदर्शन सर्वांनी आवर्जून पहावे, असे आवाहनही त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी गौरव सर्जेराव यांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला यावेळी भेट दिली. सर्जेराव यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना एक व्यंगचित्र भेट दिले. उद्धव ठाकरे शिवसेनेची धगधगती मशाल हाती घेतली आहे असे त्यांनी त्या व्यंगचित्रात दाखवले आहे.
बाळासाहेब सतत ऊर्जा देत असतात – सर्जेराव
नवे फटकारे हे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांच्या व्यंगचित्रांचे पहिलेच प्रदर्शन आहे. शिवसेनाप्रमुखांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच ते व्यंगचित्रकला शिकले. वयाने थोडा मोठा असतो तर दस्तुरखुद्द बाळासाहेबांबरोबरच व्यंगचित्रे रेखाटता आली असती आणि त्यांना माझ्या व्यंगचित्रांबद्दल काय वाटले हे समजले असते. पण बाळासाहेब आजही आपल्याला सतत ऊर्जा देत असतात, अशा भावना या वेळी गौरव सर्जेराव यांनी व्यक्त केल्या.
सेल्फी पॉइंटचे आकर्षण
मार्मिकची पार्श्वभूमी असलेला सेल्फी पॉइंटही या वेळी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे आकर्षण बनला होता. हाती कुंचला घेऊन उभे असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे कॉमन मॅन यांच्या कटआऊट्सच्या मधोमध उभे राहून मार्मिकच्या मुखपृष्ठावरच आपण आहोत, असा हा सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरता आला नाही.
‘मर्डरवाले कुलकर्णी’ पाहून सभागृह लोटपोट
‘मार्मिक’च्या वर्धापन दिनानिमित्त ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या धम्माल विनोदी नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता. एका खुनाचा साक्षीदार बनलेल्या माणसाचा टीव्हीवरील बाईट पाहून खुनी त्याला मारण्याचा निर्णय घेतो. परंतु पुढे आशा काही घडामोडी घडतात की खुन्याचे एका सज्जन माणसात परिवर्तन होते अशी ही कथा पाहताना सभागृहात हास्यकल्लोळ झाला.‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे निर्माते दिलीप जाधव आणि कलाकार वैभव मांगले व भार्गवी चिरमुले यांचा वर्धापन दिन सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
‘मार्मिक’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी गेल्या चार वर्षांत साप्ताहिक ‘मार्मिक’च्या मुखपृष्ठासाठी काढलेल्या व्यंगचित्र प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले होते. ‘नवे फटकारे’ या शीर्षकाखालील या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, उपनेते मिलिंद वैद्य, , ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, व्यंगचित्रकार संजय मिस्त्री आदी उपस्थित होते.