प्रियकराला अडकवण्यासाठी बॉम्बस्फोटाच्या धमक्या, सायबर टूल्स आणि सोशल इंजिनीअरिंग तज्ञ तरुणीला अखेर अटक

प्रियकराला अडकवण्यासाठी एका सायबर टूल्स आणि सोशल इंजिनीअरिंगमधील तज्ञ असलेल्या प्रेयसिने तब्बल 11 राज्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. अहमदाबादच्या सायबर क्राइम युनिटने या मुलीला चेन्नई येथून अटक केली आहे. रैनी जोशिल्डा असे आरोपीचे नाव असून तिने वेगवेगळ्या राज्यांमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल पाठवल्याची कबुलीही दिली आहे.

ईमेलमध्ये गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचाही समावेश आहे. चेन्नईमध्ये राहाणारी रैनी जोशिल्डा रोबोटिक्समध्ये पदवीधर आहे आणि डेलॉइटमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करते. रैनी तिच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणावर प्रेम करत होती. परंतु, यंदा या तरुणाने दुसऱया मुलीशी लग्न केले. यामुळे संतापलेल्या रैनीने त्याला अडकवण्यासाठी हा कट रचल्याचे कबूल केले. रैनी दिविज प्रभाकर आणि पाकिस्तान वेबसारख्या नावांचा वापर करून धमकीचे ईमेल पाठवत असे. यासाठी तिने डार्क वेब, व्हीपीएन आणि व्हर्च्युअल नंबरचा वापर केला. गेल्या 6 ते 7 महिन्यांत रैनीने देशभरातील 11 राज्यांमध्ये धमकीचे ईमेल पाठवले होते. त्यामुळे 11 राज्यांचे पोलीस तिचा शोध घेत होते.

नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याचीही धमकी

रैनीने अहमदाबादमधील दिव्य ज्योत स्कूल, बीजे मेडिकल कॉलेज, जिनेव्हा स्कूल आणि नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ईमेलही पाठवले होते. त्यामुळे अहमदाबाद सायबर क्राइम ब्राँचची टीमही तपासात गुंतली होती. रैनीने वेगवेगळ्या आयपी आणि डार्क वेबद्वारे संपूर्ण रचना तयार केल्याचे सायबर पथकाला आढळून आले. याच्या मदतीने तिने ईमेल आणि व्हॉट्सअॅप्स ग्रूप तयार केले होते. याद्वारे ती धमकी देणारे ईमेल आणि व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवत असे.